Ajit Pawar : टाटा कंपनीकडून मुळशी धरणातून ५ टीएमसी पाणी देण्यास तत्वतः मंजुरी ; अजित पवार यासाठी आग्रही

 

ब्युरो टीम :  यंदा पाऊस कमी झाला आहे. यामुळे पुणे शहरात पाणी टंचाईची शक्यता आहे. तसेच पुणे शहराची लोकसंख्या वाढली आहे. यामुळे सध्याचे नियोजन पुणे शहरासाठी अपूर्ण पडत आहे. पुणे शहराला सध्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणामधून पाणीपुरवठा केला जातो. परंतु पुणेकरांच्या भविष्यातील पाण्याचा प्रश्न “टाटा” सोडवणार आहे. टाटा कंपनीकडून पुणेकरांना मुळशी धरणातून ५ टीएमसी पाणी देण्यास तत्वतः मंजुरी दिली आहे. टाटा कंपनीच्या मालकीचे असलेल्या मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही होते. त्यांना टाटा कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

पुणेकरांना कसे मिळणार पाच टीएमसी पाणी

पुणेकरांना पाच टिएमसी पाणी मिळण्यासाठी मुळशी धरणाची उंची वाढवण्यात येणार आहे. यामुळे जो पाण्याचा अतिरिक्त फुगवटा होईल, त्यातून पुणे शहराला पाणी देता येणार आहे. धरणाची १ मीटरने उंची वाढवल्यानंतर हे पाणी मिळणार आहे. अजित पवार यांनी यासंदर्भात जलसंपदा विभागाची ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव टाटा कंपनी व राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले.

उंची वाढल्यामुळे जमीन पाण्याखाली जाणार

मुळशी धरणाची उंची वाढल्यास पाण्याचा फुगवटा तयार होईल. त्यामुळे परिसरातील जमीन पाण्याखाली जाणार आहे. पाण्याखाली जाणारी ८० टक्के जमीन टाटा कंपनीच्या मालकीची आहे. परंतु २० टक्के जमीन शेतकऱ्यांची आहे. ही जमीन राज्य सरकारकडून संपादीत केली जाणार आहे. यामुळे हा विषय निकाली निघणार आहे. अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीला टाटा कंपनी, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने