ब्युरो टीम : लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रसच्या अजित पवार गटाची जागावाटपावर महत्त्वाची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्लाय माहितीनुसार, अजित पवार गटाची येत्या 5 आणि 6 तारखेला जागावाटपावर मॅरेथॉन बैठक पार पडणार आहे. अजित पवार गटात लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात असताना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढवणारं एक प्रकरण समोर आलं आहे. लोणावळ्यात अजित पवार गटात मोठी नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. याच नाराजीतून तब्बल 137 जणांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
लोणवळ्यात राष्ट्रवादी (अजित पवार गटात) राष्ट्रवादी युवक शहराध्यक्षासह 137 जणांनी राजीनामा दिला आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हस्तक्षेप केल्याने नाराजी व्यक्त करत सर्वांनी राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विनोद होगले हे लोणावळा युवक शहराध्यक्ष म्हणून होते. आमदाराने परस्पर लोणावळा युवक शहराध्यक्ष पद दुसऱ्याला दिले आणि पक्ष संघटनेत डावलत असल्याचा आरोप करत महिला, युवती, तरुणांनी राजीनामा दिलाय.
वरिष्ठांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न, पण…
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या मावळमधील आणि पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज ज्यांनी राजीनामा दिला आहे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय. पण तरीही राजीनामा देणारे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. “आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत, आम्ही राजीनामा दिला आहे. २० ते २५ वर्ष झालं पक्षाच काम केलं, आम्हाला डावलून इतरांना संधी का?”, असा सवाल सर्वांनी केला आहे.
लोणावळा युवक शहराध्यक्षपदी मंगेश मावकर यांना संधी देण्यात आलीय. त्यांना काही अनुभव नाही असं असताना ही त्यांना संधी देण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. “आम्ही राष्ट्रवादी पक्षासोबत होतो. आता मात्र आम्हाला निर्णय घ्यावा लागला. लवकरच पुढचं पाऊल उचणार आहोत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार”, अशी प्रतिक्रिया राजीनामा देणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा