ब्युरो टीम : भारतीय क्रिकेटसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. भारताचा स्टार जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. बुमराहने कसोटीत प्रथमच अव्वल स्थानी पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रमवारीत पहिले स्थान मिळून बुमराहने इतिहास घडवला आहे. कारण बुमराहच्या आधी कधीच भारताच्या कोणत्याही जलद गोलंदाजाने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले नव्हते.
सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील दुसर्या कसोटीत बुमराहने ९१ धावा देत ९ विकेट घेतल्या होत्या. विशाखाट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत बुमराहच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने विजय साकारला होता. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर आयसीसीकडून बुमराहला मोठे बक्षिस मिळाले.
बुमहारच्या शानदार कामगिरीमुळे तो अव्वल स्थानी केला तर त्याचा तोटा आर अश्विनला झाला, कारण तो क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरला. दुसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह ८८१ गुणांसह अव्वल स्थानी, रबाडाचे ८५१, अश्विनचे ८४१, पॅट कमिन्सचे ८२८ तर जोश हेजलवुडचे ८१८ गुण आहेत. पहिल्या दहामध्ये बुमराह आणि अश्विनसह रविंद्र जडेजा देखील आहे. तो क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे.
भारताच्या आघाडीचा गोलंदाज बुमराहने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात रिव्हर्स स्विंगचा वापर करत इंग्लंडच्या ६ विकेट घेतल्या होत्या. तर दुसऱ्या डावात त्याने ३ विकेट मिळवल्या होत्या. पहिल्या डावातील बुमराहच्या गोलंदाजीमुळे भारताला मोठी आघाडी घेता आली. त्यानंतर टीम इंडियाने ही कसोटी १०९ धावांनी जिंकली. पहिली कसोटी गमाल्यानंतर भारताला दुसऱ्या कसोटीत विजय गरजेचा होता. दुसऱ्या कसोटीत ९ विकेट घेणाऱ्या बुमराहने भारताकडून सर्वात वेगाने १५० विकेट घेण्याचा विक्रम देखील केला होता.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी राजकोट येथे १५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. या कसोटीत भारताला विजय मिळून मालिकेत २-१ अशी आघाडी घेण्याची संधी असेल.
टिप्पणी पोस्ट करा