ब्युरो टीम : राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणासाठी घरोघरी फॉर्म दिला जात आहे. तो फॉर्म प्रत्येक कुटुंबांना भरण्यास सांगितलं जात आहे. या फॉर्ममध्ये विधवा स्त्रियांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करत फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत तक्रार केली आहे. तसेच संबंधित प्रश्न या फॉर्मवरुन हटवून देण्यात यावेत, अशीदेखील मागणी त्यांनी केली आहे. या फॉर्मध्ये स्त्रियांविषयी काही जाचक प्रश्न विचारण्यात आल्याचं दीपाली सय्यद यांचं म्हणणं आहे. ‘कुटुंबाची सामाजिक माहिती’ या मथळ्याखाली याबाबतचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. दीपाली यांनी संबंधित फॉर्मच्या प्रश्नावलीचा फोटोदेखील आपल्या पोस्टसोबत जोडले आहेत. त्यावर आता विविध जणांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
दीपाली सय्यद नेमकं काय म्हणाल्या?
“सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपण मराठा समाजाला आरक्षण संदर्भात दिलेला शब्द पूर्ण करून या समाजाला आरक्षण दिले याबद्दल आपले खूप अभिनंदन! सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आपले अभिनंदन करत असताना मी एक महिला म्हणून राज्य मागासवर्गीय आयोगाच्या प्रश्नावलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. साहेब मराठा आरक्षण देण्यासंदर्भात या समितीने विधवा महिलांच्या विषयी काही जाचक प्रश्न विचारले आहेत. तरी आपण कर्तृत्वशाली मुख्यमंत्री असून हे जाचक प्रश्न या यादीमधून तात्काळ हटवावे ही आपणास विनंती”, असं दीपाली सय्यद आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.
संबंधित फॉर्ममध्ये नेमके प्रश्न काय विचारले आहेत?
1) सरकारी योजनांचा लाभ : तुम्हाला कोणत्या सरकारी योजनांचा लाभ झाला आहे?
2) जर हो, तर कृपया लाभ मिळालेल्या प्रमुख तीन योजनांची नावे सांगा…
3) तुमच्या समाजात लग्नामध्ये हुंडा जेण्याची पद्धत आहे का?
4) तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना कपाळाला कुंकू लावण्याची अनुमती आहे का?
5) तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची अनुमती आहे का?
6) तुमच्या समाजात विधवा स्त्री औंक्षण करु शकतात का?
7) तुमच्या समाजात विधुर पुरुषांचे पुनर्विवाह होतात का?
8) तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना धार्मिक पूजा पाठ करु दिलं जातं का?
9) तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना हळदी-कुंकू कार्यक्रमांसाठी आमंत्रित करतात का?
10) तुमच्या समाजात विधवांना धार्मिक कार्यक्रमात किंवा शुभ कार्यात बोलावंल जातं का?
11) तुमच्या समाजात विवाहित स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे असं बंधन आहे का?
टिप्पणी पोस्ट करा