ब्युरो टीम : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघात विजय मिळवण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून भाजपकडून इतर राजकीय पक्षांमधील प्रमुख नेत्यांना गळाला लावण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे बाहेरुन आलेल्या नेत्यांचे थेट भाजपमध्ये किंवा सहकारी पक्षांमध्ये पुनर्वसन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते एकनाथ खडसे यांच्या घरवापसीची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आमदार गिरीश महाजन यांनी याबाबत भाष्य केले आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी फार जोर लावत आहेत, असे मला कळाले आहे. दिल्लीतून आणि राज्यातून या बातम्या माझ्यापर्यंत आल्या आहेत. पण अद्याप पक्षाच्या नेत्यांकडून मला याबाबत विचारणा झालेली नाही. मला वाटतं तसं काही प्रयोजन नाही. मला अजूनतरी कोणीही एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये परत घ्यायचे किंवा नाही, याबद्दल विचारलेले नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. कदाचित एकनाथ खडसे यांची थेट वरुन हॉटलाईन असेल तर त्यांनी लावावी, असे गिरीश महाजन यांनी म्हटले.
मोदी-शाहांच्या सिग्लनची प्रतीक्षा
गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ खडसे यांच्या घरवापसीची चर्चा सुरु आहे. एकनाथ खडसे यांची भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांशी बोलणी सुरु असल्याचे कळते. परंतु, अद्याप पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी खडसे यांच्या पक्षप्रवेशाला ग्रीन सिग्नल दाखवला नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे खडसेंची घरवापसी रखडल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजिक कार्यक्रमांमध्ये किंवा प्रसारमाध्यमांसमोर आलेले नाहीत. ते पूर्वीइतक्या आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडताना दिसत नाहीत. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा अजित पवार गटाला दिल्यानंतर खडसे गायब असल्याचे सांगितले जाते.
खडसेंनी दावा फेटाळला
एकनाथ खडसे यांना काही दिवसांपूर्वी तुम्ही भाजपमध्ये परतणार का, याविषयी विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्यांना हे वृत्त फेटाळून लावले होते. तावडे यांचा प्रयत्न भाजप मजबूत करण्याचा आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ते विविध प्रयत्न करत आहेत. त्यातूनच त्यांना जुन्या नेत्यांना पुन्हा भाजपच्या प्रवाहात आणण्याची इच्छा असावी. तावडे आणि आपले चांगले संबंध आहेत. मात्र, भाजपने आपला खूप छळ केला आहे. त्यामुळे पुन्हा त्या पक्षात जाण्याचा विचारही माझ्या मनात येणार नाही, असे खडसे यांनी सांगितले होते.
टिप्पणी पोस्ट करा