Election Commission : लवकरच लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता; पहा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार वक्तव्य

 

ब्युरो टीम : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केली असून त्या दृष्टीने आपापल्या रणनीती आखल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय निवडणूक आयोगाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचं मोठं वक्तव्य मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलंय. लोकसभेसोबत काही राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत असं ते म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वक्तव्यानंतर आता लवकरच निवडणुकांच्या घोषणा केल्या जातील अशी अटकळ बांधली जात आहे. 

काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त?  

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, "आम्ही 2024 च्या संसदीय निवडणुका आणि ओडिशा राज्याची विधानसभा निवडणूक घेण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत, त्याची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या या वक्तव्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ओडिशामध्ये या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसोबत ओडिशाच्या निवडणुकाही जाहीर केल्या जाऊ शकतात. या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपणार आहे

किती टप्प्यात मतदान होणार?

2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 9 टप्प्यात मतदान झाले होते. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 7 टप्प्यात मतदान झाले होते. आता 2024 च्या लोकसभा निवडणुका किती टप्प्यात होतील याची अधिकृत घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाईल.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने