ब्युरो टीम : छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले म्हणजे सर्वांचे स्फूर्तिस्थान आहे. गड-किल्ल्यांवर जाणाऱ्या शिवप्रेमींना नेहमी ही अनुभूती येत असते. यामुळेच गड किल्ल्यांचे संवर्धन करण्याची मागणी होत असते. शिवप्रेमींच्या मागणीची दखल घेऊन सरकारने महत्वाचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यासाठी सरकारने युनेस्को हेरीटेज लिस्ट 2024-25 साठी प्रस्ताव पाठवला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने 12 किल्ल्यांचा हा प्रस्ताव पाठवला आहे. एकीकडे सरकारचे गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न होत असताना मद्यापींना गड किल्ल्याचे पावित्र्य धोक्यात आणले आहे. पुणे येथील सिंहगडावर दारुच्या बाटल्या आढळल्या आहेत.
सिंहगडावर मद्यपींचा गोंधळ
पुणे शहरापासून सर्वात जवळ असलेल्या सिंहगडावर मद्यपींचा गोंधळ सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. किल्ले सिंहगडावर दारुच्या बाटल्या आढळल्या आहेत. किल्ल्यावर जवळपास १२ वेगवेगळ्या ब्रँडच्या दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. गड-किल्ल्यांचे पावित्र्य धोक्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त होते आहे.
शिवजयंती दहा दिवसांवर
शिवाजी महाराजांची जयंती येत्या १९ फेब्रुवारी रोजी आहे. शिवजयंतीनिमित्त अनेक शिवप्रेमी सिंहगडावर येऊन महाराजांना मानाचा मजुरा करतात. दहा दिवसांवर शिवजयंती आली असताना किल्ल्यावर तळीरामांची पार्टी केल्याचे दिसून येत आहे. परंतु त्या किल्ल्यावर दारुच्या बाटल्या कशा गेल्या? सिंहगडावर असलेले सुरक्षा रक्षक काय करतात? मद्यपी आणि गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई का केली जात नाही? असे प्रश्न शिवप्रेमींना पडले आहे. सिंहगडावर शनिवारी, रविवारी अन् सुटीच्या दिवशी अनेक जण गर्दी करतात. त्यात इतिहास समजून घेणारे किती असतात? किल्ल्यावर येणाऱ्या रिकामटेकड्या लोकांवर कारवाई का होत नाही? असे प्रश्न विचारले जात आहे.
वन विभागाने सिंहगडावर जाण्यासाठी ऑनलाईन बुकींग सुरु केले आहे. त्याच्यावेळी टवाळखोऱ्यांना रोखण्याची जबाबदारी वन विभागाचे सुरक्षा रक्षक आणि पोलिसांवर आहे. स्थानिक ग्रामस्थांनी यासंदर्भात अनेक वेळा तक्रार केल्या आहेत. त्यानंतर कारवाई होत नाही.
टिप्पणी पोस्ट करा