Girish Mahajan : महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत पुन्हा मोठा भूकंप होणार; मंत्री गिरीश महाजन यांचे भाकीत

 

ब्युरो टीम ; भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत पुन्हा मोठं भाकीत वर्तवलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी याअगोदर देखील असं भाकीत वर्तवलं आहे. त्यांनी गेल्यावेळी असं भाकीत वर्तवल्यानंतर काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. तसेच काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश केलाय. या तीनही घटना महाराष्ट्रातील जनतेसाठी अनपेक्षित होत्या. त्यानंतर येत्या आठवड्यात पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात स्फोट होणार, असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केलाय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

“मी मागच्या वेळस सांगितले स्फोट होणार आहे. त्यावेळेस काँग्रेसमध्ये स्फोट झाला. याबत त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. ते दिवाळी, दसरा सणात कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येत असतात. त्यामुळे ती कौटुंबिक भेट असेल. या सुप्रिया सुळे आणि अजित दादा भेटी संदर्भात अजित दादा सांगू शकतील. राज्यात आठ दिवसात पुन्हा स्फोट होण्याची शक्यता आहे”, असंही भाकीत गिरीश महाजन यांनी वर्तवलं.


शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नवीन तुतारीची चिन्हावर गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली. “ती तुतारी प्राण पणाने फुंकावी आणि महाराष्ट्रात घेऊन फिरावी. ह्याच त्यांना आमच्या सदिच्छा आहेत. उद्धव ठाकरे यांची मशाली पेटणार नाही आणि पवार साहेबांची तुतारीही आवाज करणार नाही”, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.

राज्यातील 6 मंत्र्यांना खासदारकीचं तिकीट देणार

सहा मंत्र्यांना खासदारकीच्या उमेदवारीवरून बोलताना गिरीश महाजन यांनी “आमच्या वरीष्ठ स्तरावरील नेते हा निर्णय घेतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जागा वाटपाबाबत चर्चा झाली असेल तरी ती अजून बाहेर आली नाही. ती केवळ अफवा आहे. लोकसभेच्या उमेदवारी ही केंद्रीय पातळीवरून घोषणा होते”, असं स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी दिलं.

‘मी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना सांगतो की…’

गिरीश महाजन यांनी यावेळी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. “आमचे अध्यक्ष त्यांना विचारूनच काम करतात की काय असे वाटायला लागले आहे. काहीही बोलायचंय कुठेही अफवा पेरायच्या हा त्यांचा उद्योग झालाय. मी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना सांगतो की, तुम्ही तुमच्या जागेवर कॉन्सन्ट्रेशन करा. आम्ही कुठल्या जागेवर लढायचं, किती जागेवर लढायचं, कुठून लढायचं हे आम्ही आमचं बघू. ठाकरे गटाने जेवढ्या जागा घेतल्या आहे त्यातून एक जागा निवडून आणून दाखवावी. मी भाजपसोबत होतो तेव्हा 18 जागा निवडून आल्या. आता त्यांनी खासदारकीची एक तरी जागा निवडून आणून दाखवावी”, असं चॅलेंज गिरीश महाजन यांनी दिलं.

‘मनोज जरांगेंनी टोकाची भूमिका न घेता…’

“मनोज जरांगे यांना सहा वेळा भेटलो. त्यांच्यासोबत बोलणी केली. दोन वेळा गुलाल उधळून झाला आणि परत पुन्हा आठ दिवसांनी आंदोलन करतायेत. पाटलांनी आंदोलन केल्यानंतर शासनाने तातडीने पावले उचलली. मागासवर्गीय आयोग नेमण्यात आला. महाराष्ट्रात पहिल्यांदा इतक्या तातडीने काम झाले. पण पुन्हा जरांगे पाटलांच्या इच्छेप्रमाणे काम होत नाही? कुठेतरी समाधान मानलं पाहिजे. आताचं विशेष अधिवेशने बोलावलं. कायद्यात बसणार आरक्षण दिलं. आम्ही करत आहोत. जरांगे पाटलांनी टोकाची भूमिका न घेता जे आहे त्या आग्रही मागण्या निश्चित करावं. पण आंदोलन उपोषण करून यातून फार काही साध्य होणार नाही”, असं गिरीश महाजन म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने