ब्युरो टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याबाबतची घोषणा केली. लालकृष्ण अडवाणी यांच्या भारतीय राजकारणातील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते जननायक कर्पुरी ठाकूर यांना भारत सरकारतर्फे भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. आता आज नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे.
नरेंद्र मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर करत असताना आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली. मी लालकृष्ण अडवाणी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला असून त्यांना भारतरत्न पुरस्काराबद्दल माहिती दिल्याचं मोदी म्हणाले. लालकृष्ण अडवाणी अलीकडच्या काळातील सर्वाधिक सन्मान मिळालेले राज्यकर्ते आहेत. अडवाणी यांनी शेवटच्या घटकापासून कामाला सुरुवात करुन उपपंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारत देशाची सेवा केली. त्यांनी गृह खातं आणि माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून देखील काम केलं, असं मोदी म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा