ब्युरो टीम : महाकवी नामदेव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्ताने विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती व इतर समविचारी संघटनांनी एकत्रितपणे काव्यवाचन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सायंकाळी ५ ते ७ या वेळात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या समोर नामदेव ढसाळ लिखीत वेगवेगळ्या कवितांचे वाचन विद्यार्थींनी केले. विद्यापीठ व पुणे शहरातील महाविद्यालयांतील विद्यार्थीं व नागरिक या काव्यवाचनात सहभागी झाले होते. यामध्ये जयश्री कांबळे, श्रावणी बुवा, बापुराव घुंगरगावकर, छाया काविरे, विश्वास भोसल , प्रा . रामदास वाघमारे , रामेश्वर खिल्लारे इ. ढसाळांच्या खेळ , गोलपिठा , तुझे बोट धरून चाललो आहे मी , तुही इयत्ता कंची , मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे , मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले , या सत्तेत जीव रमत नाही इत्यादी संग्रहातील कवितांचे वाचन करून त्यावर सविस्तर चर्चा केली.
या कार्यक्रमाची सुरुवात नामदेव ढसाळ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामेश्वर खिलारे यांनी केले. तर सुत्रसंचालन मराठी विभागाचा विद्यार्थी समाधान दुपारगुडे यांनी व समारोप व आभारप्रदर्शन अक्षय सोनकांबळे यांनी केले. समारोप करत असताना अक्षय कांबळे यांनी विद्यापीठामध्ये पँथर्स 2.0 नावांचे एक विद्यार्थी संघटन लवकरच स्थापन करण्याची घोषणा केली आहे. हे संघटन विद्यापीठ व विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थी प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी निर्माण केले जात आहे. लवकरच यासंबंधीचा कृती कार्यक्रम ठरविण्यासाठी विद्यार्थींची बैठक संपन्न होईल.
टिप्पणी पोस्ट करा