ब्युरो टीम : मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे. सलाईनमधून विष देण्याचा कट रचलेला आहे. त्यामुळेच मी सलाईन घेणं बंद केलं आहे, असा गंभीर आरोप करतानाच मी आता मुंबईला निघालोय. माझ्या जीवाला काही झालं तर माझा मृतदेह फडणवीस यांच्या बंगल्यावर नेऊन टाका, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांनी अचानक मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर, जरांगे यांनी अचानक फडणवीस यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केल्याने भाजप नेतेही संतापले असून त्यांनी मनोज जरांगे यांना गंभीर इशारा दिला आहे.
भाजपचे नेते नितेश राणे यांनी जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जरांगे यांनी आमच्या नेतृत्वावर बोलू नये. फडणवीस यांनीच सर्वात आधी मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. संपूर्ण राज्याला माहीत आहे. तरीही जरांगे फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. हे चुकीचं आहे. जरांगे यांनी फडणवीस यांच्याविरोधात बोलू नये. आमच्या नेतृत्वाविरोधात बोलू नये. आम्हीही मराठा आहोत. आम्ही दाखवून देऊ, असा इशाराच नितेश राणे यांनी दिला आहे.
स्क्रीप्टला तुतारीचा वास
मला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. ज्या मनोज जरांगे यांचा लढा मराठा आरक्षणासाठी लढा आहे की फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी लढा आहे. जरांगे जी स्क्रीप्ट वाचून दाखवत आहेत, ती कुणाची आहे? त्यांच्या स्क्रीप्टला तुतारीचा वास येत आहे. त्यांनी मराठा समाजापर्यंतच आंदोलन करावं. त्यांनी आमच्या नेतृत्वावर टीका केली तर सागर बंगल्याच्या समोर एक भिंत आहे, तिथूनच माघारी जावं लागेल हे सांगतो, असा इशारा देतानाच सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं आहे. त्यांचं समाधान होत नाही. पण मराठा समाज आनंदात आहे, असं नितेश राणे म्हणाले.
फसवणूक करू नका, जरांगे आवरा
तर, भाजपचे नेते प्रसाद लाड यांनीही मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तुला दहा टक्क्याचं आरक्षण मिळाल्यानंतर आपली खेळी संपली हे तुमच्या लक्षात आलं. समाजाच्या नावावर, लेकरू लेकरू करण्याचं बंद करा. समाजाची फसवणूक करू नका. तुमच्या सल्ल्याची समाजाला गरज नाही. फडणवीस यांच्यावर बोलू नये. तुमचे बोलविते धनी कोण हे सर्वांना समजलं आहे. शरद पवार आहे की जालन्यातील भैय्या फॅमिली आहे? बोलवता धनी कोण आहे हे मनोज जरांगे यांनी सांगावं. त्यांनी नौटंकी बंद करावी, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. तुम्हाला फडणवीस यांचं नाव घेऊ नका म्हणून सांगितलं होतं. त्यानंतरही फडणवीस यांचं नाव घ्यायला तुम्हाला कोण लावतंय हे सर्वांच्या लक्षात आलं आहे, असंही लाड म्हणाले.
सरकार दुटप्पी
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दोन समाजात फूट पाडण्याचं काम या सरकारने केलं आहे. एकाला गोंजारायचं आणि दुसऱ्याला नाकारायचं हे काम सुरू आहे. जीआर काढला. आम्हीच मराठ्यांना आरक्षण दिलं असं सांगितलं आणि आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का बसू दिला नाही, असंही या सरकारने म्हटलं. दोन्ही समाजाचे मते मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा