ब्युरो टीम : लोकसभा निवडणुकीचा बिगूल केव्हा पण वाजू शकतो. त्यापूर्वीच राजकीय जमीन कसण्यात येत आहे. लोकसभा मतदारसंघात भाजप पूर्वीपासूनच राजकीय अंदाज घेत आहे. भाजपची टीम कधीपासूनच कामाला लागलेली आहे. भाजपने विविध राज्यातील निवडणुकीत अनेक प्रयोग केले आहेत. आता लोकसभा निवडणुकीत पण हा प्रयोग होईल. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासाठी मुंबईतील लोकसभा मतदारसंघाची चाचपणी सुरु आहे. त्यांच्यासाठी कोणता मतदारसंघ योग्य ठरेल, याची चाचपणी भाजप करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अर्थात त्यासाठी एक तर एखादा मतदार संघ युतीतील सहकाऱ्यांकडून खेचून आणावा लागणार आहे. अथवा सध्याच्या एखाद्या खासदाराचा बळी तरी द्यावा लागणार आहे.
अंदाज तरी काय
पीयूष गोयल यांनी नवीन मतदार संघात उतरविण्याविषयी अनुकूल धोरण नाही. त्यांना नवीन मतदार संघातून उतरविण्यापेक्षा परंपरागत भाजपच्या मतदार संघात उतरविण्याची तालीम सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. उत्तर मध्य मुंबईत पूनम महाजन आणि उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी हे भाजपचे खासदार आहेत. या दोन पैकी एका मतदार संघात हा प्रयोग करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सुरक्षित मतदारसंघाचा शोध
गोपाळ शेट्टी यांनी 2019 मधील निवडणुकीत सिने अभिनेत्री आणि काँग्रेसची उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा 4 लाख 65 हजार इतक्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. दुसरीकडे पूनम महाजन यांनी पण प्रतिस्पर्ध्याला आस्मान दाखवले होते. त्यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा 1 लाख 30 हजार मतांनी पराभव केला होता. भाजपसाठी हे दोन्ही मतदार संघ सुरक्षित मानण्यात येतात. येथे परंपरागत भाजप मतदार मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे यापैकी एका मतदार संघातून पीयूष गोयल यांना उमेदवारी मिळू शकते.
यापूर्वी पण प्रयोग
राजस्थान, मध्यप्रदेश आणि झारखंडच्या निवडणुकीत दिग्गज केंद्रीय मंत्र्यांना उतरविण्याचा प्रयोग भाजपने केला आणि त्यात त्यांना यश पण आले. भाजप सध्या मोदी-शाह जोडीच्या प्रभावाखाली धक्कातंत्राचा प्रयोग करत आहे. आता राज्यसभेतील खासदारांना लोकसभेच्या रणधुमाळीत उतरवून त्यांना अनुभवाची शिदोरी देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे सध्या सुरक्षित मतदार संघातून या राज्यसभेतील खासदारांना नशीब आजमावता येणार आहे. पण त्यासाठी एका खासदाराचा पत्ता कट होणार, हे नक्की.
टिप्पणी पोस्ट करा