PUNE : अन्यथा पुणे शहर उडता पंजाब होईल; व्हिडिओ अपलोड करत पिट्या भाईने व्यक्त केली चिंता

 

ब्युरो टीम : पुणे शहरातील ड्रग्स प्रकरणाची चर्चा ललित पाटील प्रकरणापासून सुरु झाली. त्यानंतर आता पुणे शहरात ड्रग्सचा कारखाना मिळाला आहे. या ड्रग्स कारखान्याचे रॅकेट पंजाबमधून इंग्लंडपर्यंत निघाले. आता सांस्कृतिक शहर असलेले पुणे शहर ड्रग्सचे केंद्र होऊ लागले आहे. त्यावरुन विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली. आता मुळशी पॅटर्नमधील अभिनेते रमेश परदेशी उर्फ “पिट्या भाई” यांनी राज्याला हादरवणारा व्हिडिओ समोर आणला आहे. पुण्यातील वेताळ टेकडीवर नशेत गुंग असणाऱ्या तरुणींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वेताळ टेकडीवर काय चालले आहे…

पुणेकरांसाठी वेताळ टेकडी शहरातील महत्वाचे स्थान आहे. ही टेकडी वाचवण्यासाठी पुणेकरांनी आंदोलन केली आहेत. अनेक जण फिरण्यासाठी वेताळ टेकडीवर नियमित येत असतात. परंतु आता या टेकडीवर जे चालले आहे, ते पाहिल्यावर पुणेकरांना धक्का बसला आहे. पुणेकरांची ही भावना मराठी अभिनेता रमेश परदेशी याने समोर आणली आहे. त्यांनी स्वतः हा व्हिडिओ अपलोड करत “वेताळ टेकडीवरील धक्कादायक प्रकार समोर आणला आहे.

काय म्हणतात रमेश परदेशी

या व्हिडीओमध्ये एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत आहे तर दुसरी मुलगी ड्रग्स घेऊन नशेत बडबड करताना दिसत आहे. अभिनेते रमेश परदेशी यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ टाकला आहे. ते म्हणतात, आम्ही वेताळ टेकडीवर पळायला आलो होतो. तर येथे महाविद्यालयात असणाऱ्या पहिल्या वर्षातील दोन तरुणी बिअर, दारु आणि नशेचे काहीतरी घेऊन कोपऱ्यात पडल्या होत्या. काही तरुणांनी त्यांना उचलून आणले. आम्ही त्यांना रुग्णालयात नेत आहोत. परंतु एक पालक, सजग नागरिक, भाऊ, बहिण म्हणून आपण याकडे गांभीर्याने बघणार आहोत की नाही? असा रोखठोक प्रश्न रमेश परदेशी यांनी विचारला आहे.

हा प्रकार पाहिल्यानंतर या प्रकारामुळे रमेश परदेशी यांच्या मनाला झालेल्या वेदनाही व्हिडिओतून दिसत आहेत. प्रत्येक पुणेकरांना विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर उडता पंजाब होईल, नशेचे माहेरघर होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने