ब्युरो टीम : भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठीचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजपने एकूण तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजपात दाखल झालेलेल नेते अशोक चव्हाण, भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचा समावेश आहे. मेधा कुलकर्णी गेल्या अनेक वर्षांपासून नाराज होत्या. त्यांचं गेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापल्यामुळे त्या नाराज होत्या. भाजपने अखेर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच अजित गोपछडे यांना सुद्धा भाजपकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अजित गोपछडे हे विदर्भातील भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. ते अनेक वर्षांपासून भाजपात कार्यरत आहेत. अखेर त्यांना पक्षाकडून राज्यसभेच्या उमेदवारीचं बक्षीस मिळालं आहे.
भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संधी दिली जाणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. कदाचित त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात भाजप उतरवण्याच्या तयारीत असण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजप नेते विनोद तावडे यांच्यादेखील नावाची चर्चा होती. पण त्यांनाही संधी देण्यात आलेली नाही. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही राज्यसभा निवडणुकीत संधी देण्यात आलेली नाही.
कोण आहेत अजित गोपछडे?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या बालरोगतज्ज्ञ डॉ. अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची संधी मिळाली आहे. नांदेडमध्ये लोकसभा आणि नांदेड तसेच नायगाव विधानसभेसाठी नेहमीच चर्चेत राहिलेल्या डॉ. गोपछडे यांना अखेर पक्षनिष्ठेचे फळ मिळालं आहे.
मेधा कुलकर्णी यांची मनधरणी करण्याचा यशस्वी प्रयत्न
मेधा कुलकर्णी या पुण्याच्या कोथरुड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार आहेत. त्या दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. पण गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. त्यांच्याऐवजी मंत्री चंद्रकांत पाटील यांना संधी देण्यात आली होती. आपलं तिकीट कापण्यात आल्यामुळे मेधा कुलकर्णी या नाराज झाल्या होत्या. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत होती. पुण्यात बरेच दिवस हे नाराजी नाट्य दिसलं. त्यानंतर अखेर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा