ब्युरो टीम : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 15 फेब्रुवारीपासून तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी क्रिकेट विश्वातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा हाच आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार असल्याची मोठी घोषणा बीसीसीआय सचिव जय शाह यांनी केली आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. रोहितलाच कॅप्टन केल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये आणि रोहितच्या फॉलोवर्समध्ये आनंदाचं वातावरण आहे.
टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाची कॅप्टन्सी कुणाला मिळणार? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला होता. तसेच टी 20 वर्ल्ड कपसाठी कर्णधारपदाची माळ हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा या दोघांपैकी कुणाच्या गळ्यात पडणार? अशी एक चर्चा सुरु होती. जय शाह यांनी केलेल्या घोषणेमुळे अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. तर हार्दिक पंड्या याला मात्र उपकर्णधारपदावर समाधान मानावं लागलं आहे. इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्याआधी राजकोटमध्ये 14 फेब्रुवारी रोजी सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमच्या नामांतर कार्यक्रमात ही मोठी घोषणा केली.
टी 20 वर्ल्ड कप 2024 चं आयोजन हे अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तरित्या करण्यात आलं आहे. स्पर्धेचं आयोजन हे 1 ते 29 जून दरम्यान करण्यात आलं आहे. टीम इंडिया वर्ल्ड कपमधील आपला पहिला सामना हा 5 जून रोजी न्यूयॉर्क येथे आयर्लंड विरुद्ध खेळणार आहे. तर त्यानंतर 4 दिवसांनी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरुद्ध 2 हात करणार आहे.
जय शाह काय म्हणाले?
सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचं नामांतर आता निरंजन शाह स्टेडियम असं करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात जय शाह यांनी बोलताना टीम इंडियाचं टी 20 वर्ल्ड कप जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. “आपण वनडे वर्ल्ड कप 2023 अंतिम सामन्यात पराभूत झालो, मात्र आपण सलग 10 सामने जिंकून मनं जिंकली आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की टीम इंडिया बारबाडोसमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कप जिंकेल. आपण भारताचा झेंडा फडकवूत”, असा विश्वास शाह यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला. या कार्यक्रमात निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कॅप्टन रोहित शर्मा, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज आणि इतर खेळाडू उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा