ब्युरो टीम : टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध तिसरा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. उभयसंघात तिसरा कसोटी सामना हा 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याआधी क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियासाठी 3 वनडे मॅचेस खेळणाऱ्या आक्रमक फलंदाजाने व्यावसायिक क्रिेकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. तो फलंदाज नक्की कोण आहे हे आपण जाणून घेऊयात.
झारखंडचा डावखुरा फलंदाज सौरभ तिवारी याने क्रिकेटला रामराम केला आहे. सौरभ तिवारी सध्या रणजी ट्रॉफीत खेळतोय. सौरभ आपला अखेरचा सामना हा 15 फेब्रुवारी रोजी जमशेदपूरमध्ये खेळणार आहे. त्यानंतर तो क्रिकेटपासून कायमचा दूर होणार आहे. सौरभ तिवारी याने वयाच्या 11 व्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. सौरभ तिवारीची आक्रमक बॅटिंग पाहता त्याला भविष्यातील महेंद्रसिंह धोनी असं म्हटलं जायचं. मात्र त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर फार संधी मिळाली नाही. सौरभने टीम इंडियाचं एकदिवसीय क्रिकेटमध्ये अवघ्या 3 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. मात्र त्यानंतर सौरभला टीममध्ये संधी मिळालीच नाही. अखेर सौरभने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.
सौरभ तिवारीची निवृत्तीनंतर पहिली प्रतिक्रिया
इएसपीएन क्रिकइंफोच्या वृत्तानुसार, “माझ्यासाठी क्रिकेटचा प्रवास इथेच थांबवणं थोडं अवघड होतं. मात्र मला हे माहित आहे की हीच योग्य वेळ आहे. मला वाटतं की जर तुम्ही नॅशनल आणि आयपीएल टीममध्ये नाहीत, तर युवा खेळाडूसाठी राज्याच्या संघात जागा रिक्त करुन देणं योग्य आहे. युवा खेळाडूंसाठी अनेक संधी आहेत. माझी कसोटी संघात निवड होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे”, असं सौरभ तिवारी म्हणाला.
सौरभ तिवारीची कारकीर्द
सौरभ तिवारीने 2006 साली फर्स्ट क्लास डेब्यू केलं. सौरभने आतापर्यंत 115 सामन्यांमध्ये 8 हजार 30 धावा केल्या आहेत. सौरभने या दरम्यान 22 शतकं झळकावली आहेत. तर 116 लिस्ट ए सामन्यांमध्ये 46.55 च्या सरासरीने 4 हजार 50 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 शतकांचा समावेश आहे. तर टीम इंडियासाठी खेळलेल्या 3 एकदिवसीय सामन्यात 49 धावा केल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा