ब्युरो टीम : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे कॉंग्रेसला जोर का झटका बसला आहे. या पाठोपाठ कॉंग्रेसला आणखी एक हादरा देणारी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्याविरोधात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडी बनविण्यात आली. मात्र, याच कॉंग्रेस पक्षाचे अनेक वर्ष नेतृत्व करणाऱ्या सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
लोकसभेआधी राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक होत आहे. राज्यसभेच्या या रिक्त होणाऱ्या जागांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरायचे आहेत. गरज पडल्यास या जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. विविध राज्यांमध्ये होणाऱ्या राज्यसभेच्या या निवडणुकीत 56 जागांपैकी काँग्रेसला किमान 10 जागा मिळू शकतात अशी शक्यता आहे. काँग्रेसला तेलंगणामधून 2, कर्नाटकातून 3 तर राजस्थान, महाराष्ट्र, हिमाचल, झारखंड आणि बिहारमधून प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता आहे.
सोनिया गांधी या उत्तर प्रदेशमधील रायबरेली मतदार संघाच्या खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेल्या आहेत. तर, प्रियांका गांधी या देखील उत्तर प्रदेशमधील राजकारणात दीर्घकाळापासून सक्रिय आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधी यांच्याऐवजी प्रियांका गांधी यांना लोकसभेत उतरविण्याची तयारी कॉंग्रेसने केली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.
राजस्थानमध्ये राज्यसभेच्या 3 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यातील भाजपच्या खात्यात 2 आणि काँग्रेसच्या खात्यात 1 जागा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील एका जागेवर सोनिया गांधी यांनी निवडणूक लढवावी असा प्रस्ताव राजस्थान कॉंग्रेस कमिटीने सोनिया गांधी यांना दिला आहे. त्याचप्रमाणे मध्यप्रदेश काँग्रेसनेही सोनिया गांधी यांना राज्यसभेत राज्याचे प्रतिनिधित्व करण्याचे आवाहन केले आहे.
मध्य प्रदेश राज्य युनिट अध्यक्ष जितू पटवारी यांनी याची माहिती देताना सांगितले की, ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी नुकतीच दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांना राज्य युनिटच्या मागणीवर विचार करण्याची विनंती केली. मध्य प्रदेश काँग्रेसला सोनियाजींनी राज्यसभेत राज्याचे प्रतिनिधित्व करावे अशी इच्छा आहे. या मागणीवर राज्यातील सर्व ज्येष्ठ नेते आणि आमदारांचे एकमत आहे. यापूर्वी पंतप्रधानपद नाकारणाऱ्या सोनियाजी या मध्य प्रदेशातून राज्यसभेवर गेल्या तर जनतेचा आवाज बळकट होईल असे पक्षाला वाटते असेही पटवारी म्हणाले.\
मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यांनी केलेल्या विनंतीनुसार सोनिया गांधी आता काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे आहे. सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्या रायबरेली मतदार संघातून प्रियांका गांधी या लोकसभेची निवडणूक लढवू शकतात असेही या सूत्रांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा