ब्युरो टीम: साऊथ स्टार थलापती विजयने आता राजकारणात एन्ट्री केली आहे. त्याने शुक्रवारी (दि.2) आपला पक्ष देखील स्थापन केलाय. 'तमिळगा वेत्री काझम' असे थलापतीने त्याच्या पक्षाचे नाव ठेवले आहे. निवडणुक आयोगाकडे पक्षाची नोंदणी करण्यात आली असल्याचेही थलपती विजयने स्पष्ट केलय. 'तमिळगा वेत्री काझम' हा पक्ष 2026 ची विधानसभा निवडणुक लढणार आहे. दाक्षिणात्य अभिनेते आजवर सिनेक्षेत्राबरोबरच राजकारणातही आपली छाप सोडताना दिसले आहेत. अनेक अभिनेते हिट सिनेमे केल्यानंतर राजकारणात सक्रीय झाले होते. त्यामुळे विजयकडेही सर्वांचे लक्ष आहे. थलापती विजय रजनीकांत आणि कमल हसन यांच्याप्रमाणेच राजकारणाच्या मार्गावर जाताना दिसतोय. यापूर्वीही दाक्षिणात्य अभिनेते राजकारणात उतरले. त्यांचा राजकारणातील इतिहास मोठा आहे.
निवडणुक आयोगाकडे झाली नोंद
अभिनेता विजय थलापती म्हणाला, "आमच्या पक्षाला निवडणुक आयोगाने नोंदणीकृत केले आहे. "मी विनम्रतेने सांगू इच्छितो की, पक्षाच्या सामन्य परिषदेने आणि कार्यकारी समितीने 2024 ची लोकसभा निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, पक्षाकडून इतर कोणालाही पाठिंबा देण्यात येणार नाही." साऊथ स्टार विजय थलापतीचा चाहता वर्ग मोठा आहे. या शिवाय सामाजिक कार्यातही विजय अग्रेसर असतो. त्यामुळे लोकांमध्ये विजय थलापतीचे काम पोहोचले आहे. त्याचा त्याला राजकारणातही मोठा फायदा होईल, असे बोलले जात आहे.
स्थानिक राजकारणात विजय होता सक्रिय
विजय थलापती यापूर्वी स्थानिक राजकारणात सक्रिय होता. सोशल मीडियावरही त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे थलापतीची राजकीय कारकिर्द कशी असणार? 2026 च्या निवडणुकीत विजयचा पक्ष किती यश मिळवणार? याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. सिनेक्षेत्रात आपल्या भूमिकांतून चाहत्यांच्या पसंतीस उतरणारा विजयला दक्षिणेतील लोक राजकारणात किती साथ देणार? हे पाहावे लागेल. 2018 मध्ये थुथुकडी पोलीस फायरिंगच्या प्रकरणानंतर विजयचा राजकारणातील सहभाग वाढला होता. विजय 2026 मध्ये राजकारणात पदार्पण करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, त्यापूर्वीच त्याने राजकारणात एन्ट्री केलीये.
टिप्पणी पोस्ट करा