ब्युरो टीम : अभिनेत्री अदा शर्मा ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आली. या चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयाचं प्रचंड कौतुक करण्यात आलं होतं. त्यानंतर नुकताच तिचा ‘बस्तर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. नक्षलवादावर आधारित हा चित्रपट आहे. ‘द केरळ स्टोरी’नंतर अदाचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. मात्र सध्या तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग केलं जातंय. यामागचं कारण म्हणजे तिचं बाबा सिद्धिकी यांच्या इफ्तार पार्टीला जाणं. अदा शर्माचं इफ्तार पार्टीला जाणं काही नेटकऱ्यांना आवडलं नाही आणि त्यांनी सोशल मीडियावर तिला ट्रोल करायला सुरुवात केली. यानंतर आता अदानेही ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.
इफ्तार पार्टीला गेल्याने अदा शर्मा ट्रोल
बाबा सिद्दिकी यांच्याकडून दरवर्षी रमजानच्या महिन्यात इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जातं. या इफ्तार पार्टीला बॉलिवूडमधील मोठमोठे सेलिब्रिटी उपस्थित राहतात. सलमान खान, शाहरुख खानपासून ते अगदी नवोदित कलाकारांनाही बाबा सिद्धिकी यांच्या इफ्तार पार्टीचं निमंत्रण दिलं जातं. यंदा अभिनेत्री अदा शर्मासुद्धा या इफ्तार पार्टीला गेली होती. तिचा व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी त्यावर ट्रोलिंगला सुरुवात केली. ‘ही किती फ्रॉड आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘मुस्लिमांविरोधातील चित्रपटात ही काम करते आणि आता त्यांच्याच इफ्तार पार्टीला जातेय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘विषम दिवसांत यांच्यासाठी मुस्लीम वाईट असतात. त्यांच्याविरोधात चित्रपट बनवतात आणि सम दिवसांत हेच मुस्लीम यांच्यासाठी चांगले बनतात. कारण त्यांना बिर्याणी खाण्यासाठी बोलावलं जातं’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. या कमेंटवर अदा शर्माने उत्तर दिलं आहे. ‘प्रिय सर, विषम आणि सम दिवसांमध्ये दहशतवादी व्हिलन असतात, मुस्लीम नाही’, अशा शब्दांत तिने ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे.
‘द केरळ स्टोरी’चा वाद
अदा शर्माच्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. मात्र त्यावरून देशभरात वादसुद्धा झाला होता. चित्रपटात सांगितलेला 32 हजार महिलांचा आकडा, धर्मांतर या सर्व मुद्द्यांवरून निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना घेरण्यात आलं होतं. या आरोपांवर निर्माते विपुल शाह म्हणाले होते, “शोले या चित्रपटात गब्बर सिंग खलनायक होता. पण याचा अर्थ असा होत नाही की रमेश सिप्पी साहेब हे सिंग समुदायाच्या विरोधात होते. सिंघम चित्रपटातील खलनायक हिंदू होता. त्याचा अर्थ असा नाही की हिंदू वाईट असतात. मग आमच्या विरोधात असा विचार का? आम्ही तर फक्त अपराधींबद्दल बोलतोय.”
टिप्पणी पोस्ट करा