ब्युरो टीम : लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आहे. अशात जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर झालेलं नाही. भाजपकडून 195 उमेदवाराच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रातील जागा वाटपावर अद्याप चर्चा सुरु आहे. अशात अजित पवार यांच्या गटाकडून काही जागांसाठी आग्रह धरला जात आहे. बारामतीसह 12 जागांवर अजित पवार गटाकडून दावा सांगितला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोणत्या जागांसाठी अजित पवार गट आग्रही?
बारामती, रायगड, सातारा, शिरूर या राष्ट्रवादीकडे असणाऱ्या जागांसाठी अजित पवार गट आग्रही आहे. तर शिंदे गटाकडे असणाऱ्या बुलढाणा, हिंगोली जागा लढण्यासाठी अजित पवार गट इच्छुक आहे. भाजपकडच्या गडचिरोली, माढा या जागांची मागणी अजित पवार करत आहेत. शिवाय धाराशिव परभणी या ठाकरे गटाकडे असणाऱ्या जागांवरही अजित पवार गटाने दावा केलाय.
अजित पवार आज शिरूरमध्ये…
शिरुरचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवारांच्या होमपिचवर अजित पवारांची टोफ आज धडाडणार आहे. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा इथं अजित पवार यांचा शेतकरी मेळावा होत आहे. मांडवगण फराटा इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सहा जेसीबींमधून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात येणार आहे.
महायुतीची पुण्यात बैठक
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज महायुतीची महत्त्वाची बैठक होत आहे. मंत्री चंद्रकांत पाटील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. बारामती, शिरूर, आणि पुणे या 3 लोकसभा मतदार संघासाठी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यात होणार आहे. महायुतीतले सर्व घटक पक्ष बैठकीला हजर राहणार आहेत. सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चंद्रकांत पाटील चर्चा करणार आहेत. तिन्ही लोकसभा मतदारसंघांचा चंद्रकांत पाटील आढावा घेत वरिष्ठांना अहवाल देणार आहेत.
कोण उपस्थित राहणार?
आज दुपारी बारा वाजल्यापासून पुण्यातील भाजप मुख्य कार्यालयात बैठक सुरु होणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून महायुतीतल्या घटक पक्षांच्या सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांना चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. भाजप, शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(अजित पवार),आरपीआय, शेतकरी संघटना, लोक जनशक्ती पार्टी, शिवसंग्राम या पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित असतील.
टिप्पणी पोस्ट करा