ब्युरो टीम : अरुणाचल प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) आपल्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. विशेष म्हणजे भाजप आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये ‘राष्ट्रवादी’ने शड्डू ठोकला आहे.
ईशान्य भारतातील शेवटच्या टोकावर अरुणाचल प्रदेश आहे. साठ सदस्य असलेल्या या विधानसभेसाठी लोकसभेसोबतच निवडणूक होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार यादीत माजी आमदार लिखा साया यांच्यासह माजी मंत्री तिपांग तलोह हे प्रमुख चेहरे आहेत. या व्यतिरिक्त लोमा गोल्लो (पाक्के केसांग), न्यासम जोंगसाम (चांगलांग उत्तर), न्गोलिन बोई, अजू चिजे (नामसांग), मोंलोग योम्सो (मारियांग गेकू) आणि सलमान मोंग्रे (चांगलांग दक्षिण) यांचा समावेश आहे.
लिखा साया हे ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. ते लोवर सुबनसिरी जिल्ह्यातील यचुली मतदारसंघातून लढणार आहेत. तेथे त्यांचा सामना विद्यमान आमदार व शिक्षणमंत्री तबा तेदिर यांच्याशी होणार आहे. तर माजी मंत्री तिपांग हे सियांग जिल्ह्यातील पांगिन बोलेंग या मतदारसंघातून लढणार आहेत. पॅक्के केसांग येथून भाजपचे प्रदेशाध्यक्ष बियुराम वाहगे हे विद्यमान आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत मारियांग गेकू येथून संयुक्त जनता दलाकडून (जेडीयू) निवडून गेलेले कांगगोंग टाकू हे भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
साठ सदस्यांच्या विधानसभेत भाजपचे सर्वाधिक ५७ आमदार आहेत. या व्यतिरिक्त नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) दोन तर काँग्रेसचा एक आमदार आहे. पेमा खांडू हे मुख्यमंत्री आहेत.
टिप्पणी पोस्ट करा