ब्युरो टीम : लोकसभा निवडणुकीची महायुतीकडून तयारी सुरु आहे. जागा वाटपचा विषय आता अंतिम टप्प्यात आहे. वाद असलेल्या जागांबाबत निर्णय घेण्यात येत आहे. शिरूर लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू होता. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप मोहिते पाटील यांनी आढळराव पाटील यांना तीव्र विरोध केला होता. आता अजित पवार यांच्या शिष्टाईनंतर त्यांनी आपली तलवार म्यान केली आहे. यामुळे शिवाजी आढळराव पाटील यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झालेला आहे. आमच्या नेत्यांनी सांगितल्यामुळे आपण एक पाऊल मागे घेत आहोत. आता शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आढळराव पाटील असतील, असे दिलीप मोहिते यांनी जाहीर केले.
खेडचे आमदार दिलीप पाटील यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकत्यांनी बैठक झाली. त्यानंतर बोलताना दिलीप मोहिते म्हणाले, मी अजित पवार यांच्यामुळेच आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या विनंतीचा मान राखणे महत्वाचे आहे. शिरूरमधून महायुतीच्या उमेदवाराचे काम करण्याच्या अजित पवार यांच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार आता शिरुरमधून आढळराव पाटील निवडून येतील, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी म्हटले.
आढळराव पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार
आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश नक्की झालाय आहे. आढळराव पाटील आणि आमचा संघर्ष पराकोटीचा होता. कार्यकर्त्यांमध्ये आढळराव पाटलांसोबत जाण्यावर शंका होत्या. कार्यकर्त्यांच्या मनातील शंका कुशंका अजितदादांनी काढल्या. दादा 25 वर्षांत माझ्या घरी कधीच आले नव्हते. परंतु दादा आले. त्यांनी माझी समजूत काढली.
दिलीप मोहिते पाटील खमक्या माणूस
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक तास मार्गदर्शन केले. दिलीप मोहिते पाटील एक खमक्या माणूस आहे. बैठकीत कार्यकर्त्यांसमोर अजित पवार यांनी असे वक्तव्य केले. शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारी बाबत बैठकीत चर्चा झाली. आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश अगोदर होणार आहे. त्यापूर्वी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्याच्या सोबत बैठक घेण्याचे आपण सांगितले होते, असे अजित पवार यांनी म्हटले.
मागच्या वेळी अमोल कोल्हे यांना आपण खासदार केलं. आता ही निवडणूक गावकी भावकीची नसून ही देशाची निवडणूक आहे. भवितव्याची निवडणूक आहे. खिचडी करून येणारे लोक आली तर आपण पाहिले आहे जनता दलाचे काय झाले आहे, तुमच्यावर कोणतीही अडचण येणार नाही ही जबाबदारी मी घेतो, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा