ब्युरो टीम : बारामती लोकसभा मतदारसंघात पवार घराण्याविरोधात दंड थोपटून उभे राहिलेले विजय शिवतारे हे कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विजय शिवतारे यांना आपल्याला युतीधर्म पाळला पाहिजे, असा सल्ला दिला होता. मात्र, बारामती ही मला नियतीने दिलेली असाईनमेंट आहे, असे सांगत विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरोधात उपसलेली तलवार म्यान करण्यास विजय शिवतारे यांनी नकार दिला होता. त्यामुळे आता निर्वाणीचा उपाय म्हणून शिंदे गटाकडून विजय शिवतारे यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेकडून विजय शिवतारे यांना लवकरच पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी नोटीस पाठवली जाईल. यानंतरही विजय शिवतारे यांनी पक्षादेश मानला नाही तर त्यांना शिवसेनेकडून निरोपाचा नारळ दिला जाईल, असे सांगितले जात आहे. विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: विजय शिवतारे यांची मनधरणी केली होती. त्यानंतरही शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते. शिवतारे यांच्या या भूमिकेमुळे महायुतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महायुती अस्तित्त्वात आली तेव्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर एकमेकांशी जुळवून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, आता शिवतारे यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू शकतो. ही बाब लक्षात घेऊन एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी विजय शिवतारे यांच्यावर अखेर कारवाईचा बडगा उगारण्याचे ठरवल्याचे सांगितले जात आहे.
विजय शिवतारे म्हणतात अद्याप नोटीस आली नाही
विजय शिवतारे यांना शिवसेनेकडून त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या संभाव्य शिस्तभंगाच्या कारवाईबाबत विचारण्यात आले. तेव्हा शिवतारे यांनी म्हटले की, मला पक्षाकडून अद्याप कोणतीही नोटीस आलेली नाही. मी उद्या खडकवासला मतदारसंघाचा दौरा करणार आहे. मी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहे, असे शिवतारे यांनी सांगितले. मात्र, आता शिवसेनेने त्यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर विजय शिवतारे पुढे काय करणार, हेदेखील येणाऱ्या काळात पाहावे लागेल.
टिप्पणी पोस्ट करा