Devendra Fadanvis : बारामतीत जाऊन देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना चिमटा; म्हणाले... गृहमंत्रीपद देणार नाही

 

ब्युरो टीम : शरद पवार आणि अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत आज सरकारचा नमो रोजगार मेळावा पार पडला. या रोजगार मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित होते. सर्वच दिग्गज आणि राजकारणातील एकमेकांचे विरोधक एकाच मंचावर आल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी रंगेल असं वाटत होतं. पण देवेंद्र फडणवीस वगळता कुणीही राजकीय टोलेबाजी केली नाही. फडणवीस यांनी ही टोलेबाजी केली, पण ती शरद पवार गटाच्या विरोधात केली नाही. तर, फडणवीस यांनी थेट अजितदादांनाच चिमटे काढले. अजितदादा यांना गृहमंत्रीपद देण्यास जाहीरपणे नकारही दिला. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

बारामतीत नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यापूर्वी अजित पवार यांच्या प्रयत्नाने बारामतीत बांधणात आलेले अत्याधुनिक बस स्टँड, पोलीस स्टेशन, पोलीस मुख्यालय आणि पोलिसांच्या निवासी इमारतींचं उद्घाटन करण्यात आलं. एखाद्या कार्पोरेट ऑफिसमध्ये आल्याचा भास व्हावा असं पोलीस मुख्यालय आणि पोलीस स्टेशन बांधण्यात आलं आहे. पोलिसांच्या निवासी इमारतीही हायफाय बांधण्यात आल्या आहेत. अजितदादांच्या या कामाचं देवेंद्र फडणवीस यांनी तोंडभरून कौतुक केलं.

आता पोस्टिंगची मागणी वाढेल

अजितदादांनी हेवा वाटावं असं बस स्टँड बनवलं आहे. पोलीस क्वॉर्टर, पोलीस मुख्यालय आणि पोलीस स्टेशनही बांधलं आहे. एखाद्या कार्पोरेटचं ऑफिस वाटावं असं पोलीस मुख्यालय आणि पोलीस स्टेशन झालं आहे. पोलिसांची निवासस्थानेही तशाच पद्धतीने बांधण्यात आली आहे. त्यामुळे माझ्याकडे बारामतीलाच पोस्टिंग करा म्हणून मागणी वाढेल. बारामतीत चांगली निवासस्थाने आणि पोलीस स्टेशन आहेत, त्यामुळे आम्हाला बारामतीला पाठवा, असा हेका पोलीस लावतील.

त्यामुळे मला असं वाटतंय, पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत, त्या चांगल्या इमारती करण्यासाठी तुम्हालाच पीएमसी म्हणून नेमावं असं वाटतं. त्यावर अजितदादा म्हणतील, पीएमसीच का? गृह खातं माझ्याकडे द्या. मी चांगल्या इमारती बांधतो. पण दादा नाही, ते देणार नाही. गृहखातं माझ्याकडेच ठेवेन, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.

सर्वांना रोजगार मिळेल

आम्ही राजकारणातील लोकं कंत्राटी कामगार आहोत. दर पाच वर्षाने आम्हाला आमचं कंत्राट रिन्यू करावं लागतं. चांगलं काम केलं तर लोक आम्हाला संधी देतात आणि नाही केलं तर लोक घरी बसवतात. पण तुम्ही चांगलं काम केलं तर तुमची प्रगतीच होते. नागपूरला आपण मेळावा घेतला. 11 हजार लोकांना रोजगार मिळाला. त्यांना 50 हजाराचे पॅकेज मिळाले. 10 वी आणि 12 वी पर्यंत शिकलेल्या लोकांनाही रोजगाराची संधी मिळाली. या मेळाव्यासाठी अजितदादांनी खूप मेहनत केली. या रोजगार मेळाव्यात 55 हजार पदे आहेत. पण 36 हजार अर्ज आले आहेत. उद्यापर्यंत आणखी अर्ज येतील. सर्वांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे रोजगार मिळेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने