IPL 2024 : चेन्नई सुपरकिंग्सने केली मुंबई इंडियन्सची कॉपी; यंदाच्या हंगामात कर्णधार बदलला

 

ब्युरो टीम : आयपीएल 2024 शुक्रवारपासून सुरू होत आहे. पण या दरम्यान क्रिकेट विश्वातून मोठी बातमी आली आहे. चेन्नई सुपर किंग्जने धक्कादायक निर्णय घेत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. प्रत्येक सीझनप्रमाणेच आयपीएल सुरू होण्यापूर्वी सर्व संघांचे कर्णधार ट्रॉफीसोबत फोटोशूट करतात. या हंगामातही असेच घडले, जिथे सर्व 10 संघांच्या कर्णधारांना फोटोशूटसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी या फोटोमध्ये दिसला नाही. त्याच्या जागी संघाचा युवा सलामीवीर रुतुराज गायकवाडला पाठवण्यात आले. गायकवाड या हंगामात संघाचे नेतृत्व करणार असल्याचे आता सीएसकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आयपीएल ट्रॉफीसोबत कर्णधाराचे फोटोशूट झाल्यानंतर चाहत्यांना असे समजले होते की, रुतुराज गायकवाड या हंगामात संघाचा कर्णधार असेल, पण काही वेळाने चेन्नई सुपर किंग्स असेही सांगण्यात आले की एमएस धोनीने त्याचे कर्णधारपद रुतुराज गायकवाडकडे सोपवले आहे.

आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार

एमएस धोनीला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर आयपीएलच्या सुवर्णकाळाचाही अंत झाला असे त्याचे चाहते म्हणत आहेत. एमएस धोनी हा आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने एकूण पाच आयपीएल विजेतेपदे जिंकली. त्यांचा संघ गेल्या मोसमात देखील चॅम्पियन बनला होता.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने याआधी 2022 च्या मोसमात कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आले होते, परंतु संघाच्या खराब कामगिरीमुळे जडेजाने हंगामाच्या मध्यातच कर्णधारपद सोडले आणि धोनीला पुन्हा कर्णधारपद स्वीकारावे लागले होते. यानंतर 2023 च्या मोसमात धोनीने चेन्नईला त्याच्या नेतृत्वाखाली पाचव्यांदा चॅम्पियन बनवले आहे.

महाराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा ऋतुराज गायकवाड हा 2020 पासून चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळतो आहे. आतापर्यंत त्याने चार मोसमात 52 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 39.07 च्या सरासरीने आणि 135.52 च्या स्ट्राईक रेटने 1797 धावा केल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने