IPL 2024 : रोहितचे चाहते हार्दिकच्या चाहत्यांशी भिडले; कालच्या सामन्यादरम्यान घडला प्रकार

 

ब्युरो टीम : आयपीएल 2024 स्पर्धेत पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. या दोन्ही संघात स्पर्धेपूर्वीच मोठी उलथापालथ झाल्याने मैदानात काही ना काही राडा होणार याची कल्पना होती. मुंबई इंडियन्सचा कर्णधार बदलला आणि हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवलं. तर गुजरातने हार्दिक पांड्याला सोडल्याने नेतृत्व शुबमन गिलकडे आलं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चाहत्याचं नाराजीनाट्य सुरु होतं. त्याचा पहिला अंक अहमदाबादच्या स्टेडियममध्ये पाहायला मिळाला. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याचे चाहते भर मैदानात भिडल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुजरात टायटन्सच्या चाहत्यांनी रोहित शर्माच्या चाहत्यांना साथ दिली. त्यामुळे हार्दिक पांड्याचे चाहते नाराज झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे स्टेडियममध्ये रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याच्या चाहत्यांमध्ये बाचाबाची झाली.

नाणेफेकीचा कौल ते सामना संपेपर्यंत चाहत्यांनी एकमेकांना डिवचण्याची एकही संधी सोडली नाही. टॉसवेळी गुजरात टायटन्सच्या चाहत्यांनी हार्दिक पांड्याची खिल्ली उडवत स्वागत केलं. दुसरीकडे, रोहित शर्माचे चाहते हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यामुळे रोहित शर्माच्या नावाच्या घोषणा ऐकू येत होत्या. तसेच रोहित शर्माचे पोस्टर हाती घेऊन चाहते आपला संताप व्यक्त करत होते. त्यामुळे दोन्ही बाजूने वाद टोकाला गेला आणि हाणामारी झाल्याचं बोललं जात आहे. मात्र या व्हायरल व्हिडीओची पुष्टी आम्ही करत नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसर हा एक दोन फॅन्समधील मारहाणीचा व्हिडीओ आहे. याचा रोहित-हार्दिक चाहत्यांशी काहीही संबंध नाही. 

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. यावेळी पहिलं षटक हार्दिक पांड्याने हाती घेतलं आणि टाकलं. त्यामुळेही हार्दिक पांड्या ट्रोल झाला. त्याने पहिल्याच षटकात 11 धावा दिल्या. त्यानंतर हार्दिक पांड्याने तिसऱ्या षटाकत 9 धावा दिल्या. तर बुमराहकडे चौथं षटक सोपवलं, त्यात त्याने एक गडी बाद केला. त्यानंतर थेट 7 षटकानंतर बुमराहला षटक दिलं.

गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 168 धावा केल्या आणि विजयासाठी 169 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठणं मुंबई इंडियन्सला कठीण गेलं आणि 7 धावा कमी पडल्या. मुंबई इंडियन्सने 9 गडी गमवून 162 धावा केल्या आणि 6 धावांनी पराभव झाला. त्यामुळे यंदाही मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवाने झाली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने