ब्युरो टीम : अभिनेत्री जान्हवी कपूर तिरुपती बालाजी यांची खूप मोठी भक्त आहे. त्यामुळे ती दिवंगत आईच्या वाढदिवशी तिरुमला तिरुपती याठिकाणी दर्शनासाठी आवर्जून जाते. जान्हवीने यंदाचा तिचा वाढदिवससुद्धा तिरुपती याठिकाणीच साजरा केला. सेलिब्रिटी आणि स्टारकिड्सचा खास मित्र ओरहान अवत्रमणी ऊर्फ ऑरीने तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी तिच्या गुडघ्यांवर बसून तिरुपती बालाजी मंदिरात जाण्यासाठीच्या पायऱ्या चढताना दिसतेय. 6 मार्च रोजी आपल्या 27 व्या वाढदिवसानिमित्त जान्हवी तिचा खास मित्र ऑरी आणि बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत तिरुपतीला पोहोचली होती. तिरुपती बालाजीचं मंदिर हे जान्हवीच्या खास जवळचं आहे, कारण तिची आईसुद्धा अनेकदा त्याठिकाणी जायची.
जान्हवीने तिच्या वाढदिवशी बालाजीचं दर्शन घेतलं. या मंदिराला भेट देण्याची ही तिची 50 वी वेळ होती. ऑरीने याचा व्लॉग त्याच्या युट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी म्हणतेय, “प्रत्येकाने एकदा तरी तिरुपती मंदिराच्या पायऱ्या चढून जावं, कारण ही प्रक्रिया तुम्हाला अधिक विनम्र बनवते.” तिरुपतीला जान्हवीचा हा 50 वा दौरा, शिखरचा नववा आणि पहिला पहिला दौरा असल्याचं ऑरी पुढे सांगतो. यानंतर तिघं दाक्षिणात्य खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतानाही दिसून येतात. जान्हवी तिच्या साऊथ इंडियन थाळीत तूप टाकताना दिसून येत आहे.
जान्हवी तिच्या गुडघ्यावर बसून मंदिराच्या पायऱ्या चढते. जेव्हा ऑरी तिला त्याबद्दल विचारतो, तेव्हा ती मंदिराशी असलेल्या अध्यात्मिक नात्याविषयी व्यक्त होते. तीन तासांच्या प्रवासानंतर हे तिघं मंदिरात पोहोचतात. दर्शनानंतर जान्हवी जेव्हा चार्टर्ड प्लेनने घरी परतते, तेव्हा प्लेनमध्येच ती केक कापून वाढदिवस साजरा करते. हे क्षणसुद्धा ऑरीच्या व्लॉगमध्ये पहायला मिळतात.
जान्हवी कपूर गेल्या काही काळापासून शिखर पहाडियाला डेट करतेय. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. ‘कॉफी विथ करण 8’मध्ये जान्हवीने अप्रत्यक्षरित्या तिच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केला होता. त्यानंतर शिखर आणि जान्हवी यांना तिरुपती बालाजी मंदिरात एकत्र पाहिलं गेलं. शिखर पहाडिया हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. वीर आणि शिखर हे भाऊ-भाऊ आहेत. जान्हवी आणि शिखर यांचं एकाच शाळेत शिक्षण झालं आहे. त्यामुळे शाळेपासूनच दोघं एकमेकांना ओळखतात.
टिप्पणी पोस्ट करा