kavya Mahotsav : साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे शनिवारी आणि रविवारी रंगणार दोन दिवसीय "काव्य महोत्सव"

 

ब्युरो टीम : साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे शनिवार दिनांक १६ आणि रविवार दिनांक १७ मार्च २०२४ रोजी "काव्य महोत्सव" हे दोन दिवसीय काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन कॉर्नर, कर्वे रोड, पुणे येथे आयोजित या दोन दिवसीय काव्य महोत्सवात महाराष्ट्रातील दिग्गज कवी सहभागी होणार असून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांव्दारे काव्यविश्वाचे भावरंग उलगडणार आहेत. हा महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे, अशी माहिती साहित्यदीप प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर आणि अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी सल्लागार ऍड .विलास अत्रे आणि सल्लागार डॉ. संदीप अवचट उपस्थित होते. 

या महोत्सवात कविता हा विषय केंद्रस्थानी ठेवून परिसंवाद, पुस्तक प्रकाशन, काव्य संमेलन, मुशायरा असे विविध कार्यक्रम होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांची निवड करण्यात आली आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन शनिवार दिनांक १६ मार्च २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश महामंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आणि प्रसिध्द लेखक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी उपस्थित राहणार आहेत. 

यानंतर दुपारी १२.०० वाजता प्रसिध्द कवयित्री आणि लेखिका मुग्धा गोडबोले यांची प्रकट मुलाखत होणार असून त्यांच्या कवी डॉ. संदिप अवचट संवाद साधणार आहेत. यानंतर दुपारी २.०० वाजता प्रसिद्ध कवी आणि गझलकार रमण रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली कवितेतील बदलते प्रवाह या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये प्रसिद्ध कवयित्री व लेखिका अंजली कुलकर्णी, प्रसिद्ध लेखक व कवी विश्वास वसेकर, प्रसिद्ध कवयित्री व लेखिका सुनिता रामचंद्र सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी कवयित्री मीना शिंदे संवाद साधणार आहेत. दुपारी ३.३० वाजता प्रसिद्ध कवी अशोक बागवे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे उपस्थित राहणार आहेत. या कविसंमेलनात या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, संजय चौधरी (नाशिक), दादा मडकईकर (सावंतवाडी), जयश्री हरी जोशी (मुंबई), प्रभा सोनवणे, कल्पना दुधाळ, विलास कुवळेकर (लांजा), डॉ. राहुल देशपांडे, महेश देशपांडे (मुंबई), पूजा भडांगे (धाराशीव), वैभव वऱ्हाडी (मुंबई) आदी मान्यवर कवी सहभागी होणार आहेत. 

यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता "चलो इक बार फिर से" ही महान शायर व गीतकार साहिर लुधयानवी यांच्या जीवनावर आधारीत कविता व गाण्यांची मैफल होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन आणि निवेदन शलाका गोळे यांचे असून प्रसिध्द गायक अली हुसेन आणि मोमिता गॉन हा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यांना कीबोर्डवर ओंकार पाटणकर,

रिदमवर संजय खाड्ये आणि तबल्यावर डॉ. राजेंद्र दूरकार हे वादक कलाकार साथसंगत करणार आहेत. 

यामध्ये रविवार दिनांक १७ मार्च २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता नवनिर्वाचित खासदार मेधा कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी अक्षरवाटा या प्रातिनिधिक कविता संग्रहांचे प्रकाशन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून अॅड. प्रार्थना सदावर्ते, तसेच संपादक  अॅड. विलास अत्रे, वि. सु. चव्हाण, सतीश कुलकर्णी आणि वल्लरी प्रकाशनाचे व्यंकटेश कल्याणकर उपस्थित राहणार आहेत. 

यानंतर दुपारी १२.०० वाजता आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त आचार्य अत्रे आणि शिरीष पै यांच्या कवितांवर आधारित काव्यधारा हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र काळे उपस्थित राहणार असून संहिता वाचन राजेंद्र पै करणार आहेत, तर यामध्ये माधुरी ताम्हाणे- देव आणि गायिका शिवानी गायतोंडे कविता आणि गीते सादर करणार आहेत. यानंतर दुपारी २.०० वाजता ज्येष्ठ लेखिका, कवयित्री आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. अरूणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली वारसा साहित्यिकांचा हा कार्यक्रम होणार असून यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिध्द कवयित्री आणि लेखिका नीरजा उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रथमेश पाठक, सुनीति लिमये, संकेत म्हात्रे आणि आदित्य दवणे हे तरूण कवी सहभागी होणार आहेत.  यानंतर दुपारी ३.३० वाजता प्रसिध्द गझलकार राजेंद्र शहा यांच्या अध्यक्षतेखाली  गजल मुशायरा होणार आहे. यामध्ये डॉ. दिलीप पांढरपट्टे (मुंबई), भूषण कटककर, प्रमोद खराडे, वैभव कुलकर्णी (पंढरपूर), शिल्पा देशपांडे (मुंबई), ज्योत्स्ना रजपूत (पनवेल), विशाल राजगुरु (मुंबई), सारंग पपटवारसूत्र हे गझलकार सहभागी होणार आहेत. यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी आचार्य रतनलाल सोनग्रा, सुनिताराजे पवार, प्रमोद आडकर, प्रज्ञा महाजन, राजू कांबळे, रवींद्र कुलकर्णी, धनंजय तांबेकर, महेश पोहनेरकर, दीपक जेवणे, अभय नाडकर्णी यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे. यानंतर संध्याकाळी ६.०० वाजता "अवघा रंग एक झाला" हा कार्यक्रम गायिका  मालविका दीक्षित, निशा दीक्षित आणि लीना राजवाडे सादर करणार आहेत. त्यांना हार्मोनियमवर मंदार गोडसे, सिंथेसायझरवर ओंकार पाटणकर, तबल्यावर नचिकेत मेहेंदळे आणि तालवाद्यांवर वृंदा मेहेंदळे हे वादक कलाकार साथसंगत करणार आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने