Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला ; प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ. नामदेव उसेंडी यांचा राजीनामा

 

ब्युरो टीम : एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. तर दुसरीकडे गडचिरोलीतील काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला लागला आहे. गडचिरोलीतील काँग्रेसचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव आणि आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी आज दुपारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता ते आज सायंकाळी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. 

काँग्रेसला गेल्या काही दिवसांपासून एका मागे धक्के बसत असल्याचे दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपात प्रवेश केला. त्यांनतर मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 

 डॉ. नामदेव उसेंडी संध्याकाळी करणार भाजपमध्ये प्रवेश 

माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी हे गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्यांना निवडणुकीत तिकीट न दिल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच त्यांनी आज (दि. 26) आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने गडचिरोलीत मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. नामदेव उसेंडी हे गडचिरोलीवरून  नागपूरच्या दिशेने निघाल्याची माहिती मिळत असून त्या संध्याकाळी भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती मिळत आहे. 

लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी डॉ. उसेंडी इच्छुक 

दरम्यान, डॉ. नामदेव उसेंडी हे 2008 पासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत.  2009 मध्ये डॉ. उसेंडी हे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 आणि 2019 साली काँग्रेस पक्षाकडून ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मात्र दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभव पत्कारावा लागला. 2024 सालची निवडणूक लढवण्यासाठी देखील डॉ उसेंडी इच्छुक होते. मात्र गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. 




0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने