ब्युरो टीम : शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे आपल्या आगळ्या वेगळ्या वक्तव्याने चर्चेत असतात. आता शहाजी बापू यांनी ठाकरे गटाची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षासंदर्भात भविष्य वर्तवले आहे. त्यांनी आगामी काळात भाजप म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना जाणार असल्याचा दावा केला आहे. आपला अंदाज कधीही चुकणार नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा आता चांगली रंगली आहे. त्यांच्या या दाव्याला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून दुजोरा मिळाला नाही.
काय म्हणाले शहाजी बापू
एक हजार टक्के मोदी साहेब आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत. माझा अंदाज कधीही चुकणार नसल्याचे वक्तव्य आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले. तसेच निवडणूक ही तुमच्या पाच वर्षांच्या कामावर आणि कष्टावर चाललेली असते. कोणत्याही निवडणुकीत शेवटचे दोन दिवस सर्वात महत्त्वाचे असतात. या दोन दिवसांचा अंदाज निवडणूक सर्व्हे करणाऱ्यांनाही येत नाही. नुकत्याच झालेल्या मध्यप्रदेश, राजस्थान विधानसभेचा निवडणूक सर्वे चुकला. सर्व्हे त्याचबरोबर बीआरएस बाबत तेलंगणातील सर्व्हे देखील चुकला होता. त्यामुळे सर्व्हेवर विश्वास किती ठेवायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.
लोकसभेला 45 च्यावर जागा
पक्षांतरावर बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले की, राजकारणात निवडणुकाजवळ आल्या की कार्यकर्त्यांचे सुगीचे दिवस येतात. सुगीच्या दिवसांत जसे पाखरे या रानातून त्या रानात हिंडत असतात, तसेच या पक्षातून त्या पक्षात कार्यकर्ते आणि नेतेही जात असतात. ही लोक फक्त संधीचा शोध घेत असतात. आगामी लोकसभा निवडणुकीत आमच्या महायुतीला लोकसभेला 45 च्यावर जागा निवडून येण्याचा दावा शहाजी बापू यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर जनतेचा प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे. जनमताचा हा कौल ओळखून शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नुकतेच शिवसेनेत प्रवेश केला. आगामी काळात संपूर्ण तालुक्यात परिवर्तन झालेले पाहायला मिळेल, असे शहाजी बापू यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा