ब्युरो टीम : सध्या देशभरात निवडणुकीची हवा आहे. सत्तेतील भाजपासह देशातील छोटे-मोठे राजकीय पक्ष लोकसभा निवणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपासह अनेक राजकीय पक्षांनी आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. तर यादरम्यान एक आश्चर्यचकित करणारे वृत्त समोर आले आहे ज्यामध्ये देशाची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या निर्मला सीतारामन यांनी भारतीय जनता पक्षाचा (भाजप) निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी लागणारा पैसा आपल्याकडे नसल्याचे सांगत त्यांनी भाजपाचा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यांनी म्हटले की भाजप अध्यक्ष (जेपी नड्डा) यांनी त्यांना आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूमधून निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला होता. परंतु, पैशांच्या कमतरतेचे कारण देत सीतारामन यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. देशाची अर्थव्यवस्था चालवणाऱ्या सीतारामन यांच्याकडे किती संपत्ती आहे जाणून घेऊया.
निर्मला सीतारामन यांची नेटवर्थ (संपत्ती) किती?
मायनेटा इन्फो वेबसाइटनुसार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची एकूण संपत्ती दोन कोटी ५० लाख ९९ हजार ३९६ रुपये असून यामध्ये जंगम आणि स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. त्यांच्याकडे ३१५ ग्रॅम सोन्याव्यतिरिक्त दोन किलो चांदीही आहे. दरम्यान, निर्मला सीतारामन यांच्याकडे स्वतःची कार नसून त्यांच्या नावावर बजाज चेतक स्कूटर आहे ज्याची किंमत २८,२०० रुपये आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे हैदराबादजवळ सुमारे १६ लाख रुपयांची बिगरशेत जमीन असून त्यांच्या स्थावर मालमत्तेची किंमत १,८७,६०,२०० रुपये आहे. सीतारामन यांच्या नावावर ३,५०,००० रुपयांचे वैयक्तिक कर्जही आहे. याशिवाय त्यांनी ३०,४४,८३८ रुपयांचे दुसरे कर्जही घेतली असून राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात १७,२०० रुपये रोख असल्याचे जाहीर केले होते. तसेच ४५,०४,४७९ रुपयांची एफडीची माहितीही त्यांनी दिली होती.
सीतारामन निवडणूक लढवणार नाहीत
अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, ‘माझा युक्तिवाद त्यांनी मान्य केला याबद्दल मी खूप आभारी आहे... म्हणूनच मी निवडणूक लढवत नाही.’ देशाच्या अर्थमंत्र्यांकडेही लोकसभा निवडणूक लढवण्याइतके पैसे का नाहीत, असे त्यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, ‘भारताचा एकत्रित निधी त्यांचा स्वत:चा नाही.’
‘आठवडा-दहा दिवस विचार करून मी उत्तर दिले... नाही. माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी इतका पैसा नाही. आंध्र प्रदेश असो की तामिळनाडू हा प्रश्न मलाही आहे. जिंकण्यासाठी वेगवेगळ्या निकषांचाही प्रश्न आहे... तुम्ही या समाजाचे आहात की त्या धर्माचे? मी म्हणाले नाही, मला वाटत नाही की मी ते करण्यास सक्षम आहे.’
लोकसभा लढण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत
सीतारामन पुढे म्हणाल्या की , ‘माझा पगार, माझे उत्पन्न, माझी बचत माझी आहे, भारताचा एकत्रित निधी नाही.’ लोकसभा निवडणुकीत भाजपने अनेक राज्यसभेचे सदस्य उभे केले आहेत ज्यामध्ये पियुष गोयल, भूपेंद्र यादव, राजीव चंद्रशेखर, मनसुख मांडविया आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचा समावेश आहे. कर्नाटक राज्यसभेच्या सदस्या निर्मला सीतारामन यांनी विविध उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले आणि म्हणाल्या की ‘मी मीडियाच्या अनेक कार्यक्रमांमध्येही सहभागी होणार आहे. मी प्रचारात सहभागी होईन.’
टिप्पणी पोस्ट करा