ब्युरो टीम : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे सुद्धा दिल्लीला गेले आहेत. राज ठाकरे काल (18 मार्च) संध्याकाळी मुंबई विमानतळावरुन दिल्लीच्या दिशेला रवाना झाले. ते काल रात्री 11 वाजेच्या सुमारास दिल्लीत पोहोचले. त्यानंतर आज सकाळी त्यांची दिल्लीत भाजप नेते विनोद तावडे यांच्यासोबत बैठक पार पडली. विनोद तावडे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली. यावेळी मनसे नेते अमित ठाकरे देखील उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे-भाजप युतीचे प्रयत्न दोन्ही बाजून केले जात आहेत. त्याचसाठी राज ठाकरे दिल्लीला गेल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे चार दिवसांपूर्वीदेखील दिल्लीला गेले होते. राज ठाकरे यांच्या आताच्या दिल्ली दौऱ्यात त्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडलीय. या बैठकीत मनसेला लोकसभेच्या किती जागा सोडल्या जातील, मनसेचं सत्तेत काय स्थान आहे? याबाबत चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय.
या सर्व घडामोडींदरम्यान मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीचे फोटो पोस्ट करत भूमिका मांडली आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मलाही या ग्रेट भेटीचा साक्षीदार होता आलं, असं अमित शाह आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यानीदेखील अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. “आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ह्यांच्याशी दिल्लीत भेट झाली”, असं राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा