Rajanikant : आता मला या कॅमेऱ्यांकडे पाहून भीती वाटतेय; एका कार्यक्रमात अभिनेते रजनीकांत यांचे वक्तव्य

 

ब्युरो टीम : सिनेसृष्टीतील कलाकारांचा राजकारणाशी फार जुना संबंध आहे. बॉलिवूड किंवा टॉलिवूड.. असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी चित्रपटांनंतर राजकारणात प्रवेश केला आणि जनतेची सेवा केली. नुकतेच देशभरात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. अशातच साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी मस्करीत असं काही म्हटलंय, ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे. रजनीकांत हे तमिळनाडूमधील चेन्नई याठिकाणी एका रुग्णालयाच्या शाखेच्या उद्घाटनासाठी पोहोचले होते. यावेळी माध्यमांसमोर बोलताना त्यांनी निवडणुकांचा उल्लेख केला. मात्र निवडणुकांविषयी रजनीकांत जे म्हणाले, ते ऐकून उपस्थितांमध्येही हशा पिकला.


या कार्यक्रमात रजनीकांत यांनी स्पष्ट केलं की त्यांना फार काही बोलायचं नाहीये, कारण ही निवडणुकांची वेळ आहे. निवडणुकांच्या वेळी श्वास घ्यायलाही भीती वाटत असल्याचं ते म्हणाले. देशभरात निवडणुकीचे वारे वाहत असताना काही बोलणं भीतीदायक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “मला अजिबात बोलायचं नाहीये. मात्र मला दोन शब्द बोलण्यास सांगितलं गेलंय. मी त्यांना विचारलं की कार्यक्रमात मीडियासुद्धा असेल का? त्यावर ते म्हणाले की काही असतील. आता मला या कॅमेऱ्यांकडे पाहून भीती वाटतेय. ही निवडणुकांची वेळ आहे. त्यामुळे मला श्वास घ्यायलाही भीती वाटते.” हे ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो.

या भाषणात रजनीकांत पुढे म्हणतात, “आधी जेव्हा विचारलं जायचं की कावेरी रुग्णालय कुठे आहे, तर लोक म्हणायचे की कमल हासन यांच्या घराजवळ आहे. आता जेव्हा विचारलं जातं की कमल हासन यांचं घर कुठे आहे तर लोक म्हणतात की कावेरी रुग्णालयाजवळ आहे. हे मी सहजच म्हणतोय. मी मीडियाला विनंती करतो की त्यांनी यावरून असं लिहू नये की रजनीकांत यांनी कमल हासन यांच्यावर टीका केली.”

यावेळी बोलताना रजनीकांत यांनी त्यांच्या सर्जरीचाही उल्लेख केला. कावेरी रुग्णालयातच त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली होती. त्यावेळी डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांची कशाप्रकारे काळजी घेतली, याविषयी त्यांनी सांगितलं. 73 वर्षीय रजनीकांत यांच्यावर अनेकदा तमिळनाडूमधील विविध रुग्णालयांमध्ये आरोग्याच्या समस्यांवरून उपचार झाले. त्यामुळे आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतल्याबद्दल त्यांनी यावेळी डॉक्टर आणि नर्सेस यांचे आभार मानले.

रजनीकांत यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, ते सध्या टी. जे. ज्ञानवेल दिग्दर्शित ‘वेट्टियान’ या चित्रपटाची शूटिंग करत आहेत. यामध्ये त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन, फहाद फासिल आणि राणा दग्गुबत्ती यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाच्या पुढील शूटिंगसाठी ते केरळला जाणार आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने