ब्युरो टीम : उपांत्य सामन्यात विदर्भाच्या संघानं मध्य प्रदेशचा 62 धावांनी धुव्वा उडवत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. आता रविवारी वानखेडे मैदानावर मुंबई आणि विदर्भाच्या संघात फायनलचा थरार रंगणार आहे. मुंबईने तामिळनाडूचा पराभव करत फायनलचं तिकिट पक्कं केले होतं. आज विदर्भानं फायनलमध्ये धडक मारली. विदर्भाकडून यश राठोड यानं शानदार शतकी खेळी केली होती, त्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
विदर्भानं पहिल्या डावात फक्त 170 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल मध्य प्रदेशनं 252 धावांपर्यंत मजल मारत आघाडी घेतली होती. पण विदर्भानं दुसऱ्या डावात शानदार कमबॅक केले. विदर्भानं दुसऱ्या डावात 402 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर मध्य प्रदेशला 258 धावांत गुंडाळलं. मध्य प्रदेशचे दिग्गज फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले.
पहिल्या डावात काय झालं ?
विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकर यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण मध्य प्रदेशच्या भेदक माऱ्यापुढे विदर्भाची फलंदाजी ढेपाळली. विदर्भाचा संघ अवघ्या 170 धावांत ढेर झाला. विदर्भाकडून अथर्व तायडे 39 धावांची खेळी केली. तर करुण नायर यानं सर्वाधिक 63 धावांचं योगदान दिलं. या दोघांचा अपवाद वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले.
मध्य प्रदेशकडून आवेश खान यानं सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर कुलवंत खोजारिया आणि वेंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. अनुभव अग्रवाल आणि कुमार कार्तिकेय यांना एक एक विकेट मिळाली.
विदर्भाला झटपट गुंडाळल्यानंतर मध्य प्रदेशनं 252 धावांपर्यंत मजल मारली. मध्य प्रदेशकडून हिमांळ मंत्री यानं शतकी खेळी केली. त्यानं एक षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 126 धावांचे योगदान दिलं. इतरांकडून त्याला चांगली साथ मिळाली नाही. यश दुबे, हर्श दवळी, शुभम शर्मा, वेंकटेश अय्यर, सागर सोळंकी अपयशी ठरले. एकाही फलंदाजाला अर्धशतक ठोकता आले नाही, मंत्रीनं एकट्यानं लढा दिला.
विदर्भाकडून उमेश यादव यानं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय यश ठाकूर यानेही तीन विकेट घेतल्या. अक्षय वखारे याने दोन तर आदित्य सरवते यानं एक विकेट घेतली.
दुसऱ्या डावात काय झालं ?
पहिल्या डावात 170 धावांवर डाव आटोपलेल्या विदर्भानं दुसऱ्या डावात जोरदार पलटवार केला. विदर्भानं दुसऱ्या डावात 402 धावांपर्यंत मजल मारली. विदर्भाकडून यश राठोड यानं शतकी खेळी केली. यश राठोड यानं 141 धावांचं योगदान दिलं. त्याशिवाय अमन मोखाडे आणि अक्षय वाडकर यांनी अर्धशतके ठोकली. अमन मोखाडे यानं 59 तर अक्षय वाडकर यानं 77 धावा जोडल्या.
मध्य प्रदेशकडून अनुभव अग्रवाल यानं सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. तर कुलवंत खजोरिलिया आणि कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.
विदर्भानं दिलेल्या 318 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मध्य प्रदेशनं संयमी सुरुवात केली. पण ठराविक अंतरानं विकेट फेकल्या. मध्य प्रदेशकडून यश दुबे यानं 94 धावांचं योगदान दिलं. हर्ष गवळी यानं 67 धावांची खेळी केली. या दोघांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना अपयश आले. सागर सोळंकी, शुभम शर्मा आणि वेंकटेश अय्यर यांना लौकिकास साजेशी खेळी करण्यात अपयश आलं.
विदर्भाकडून यश ठाकूर आणि अक्षय वाखारे यांनी भेदक मारा केला. त्या दोघांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय आदित्य ठाकरे आण आदित्य सरवते यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.
टिप्पणी पोस्ट करा