ब्युरो टीम : आयपीएलच्या 17 व्या हंगामाची रंगारंग कार्यक्रमानंतर गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सनेही धमाकेदार सुरुवात केलीय. कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पहिल्या सामन्यात पाणी पाजलं. चेन्नईने 174 धावांच्या विजयी लक्ष्य हे 4 विकेट्स गमावून 8 चेंडूआधी पूर्ण केलं. चेन्नईच्या प्रत्येक फलंदाजाने या विजयात योगदान दिलं. तर आरसीबी विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. कर्णधार म्हणून ऋतुराजच्या कारकीर्दीची अफलातून अशी सुरुवात झाली. ऋतुराजने विजयानंतर नेतृत्वाचा अनुभव कसा होता? सामन्यातील टर्निंग पॉइंट काय होता? आणि इतर मुद्द्यांवर भाष्य केलं.
ऋतुराज गायकवाड काय म्हणाला?
“सुरुवातीच्या काही षटकांचा अपवाद वगळता सामना आमच्या नियंत्रणात होता. मात्र आरसीबीच्या फलंदाजांनी अखेरीस चांगली खेळी केली. तसेच फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल झटपट आऊट होणं हा टर्निंग पॉइंट होता”, असं ऋतुराज म्हणाला. टॉस जिंकून विराट कोहली याच्यासोबत बॅटिंगसाठी आलेल्या कॅप्टन फाफ डु प्लेसिस याने झंझावाती खेळी केली. फाफने 35 धावांची विस्फोटक खेळी करत आश्वासक सुरुवात करुन दिली. मात्र त्यानंतर आरसीबीने 3 विकेट्स झटपट गमावल्या. फाफ आऊट झाल्यानंतर रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेल हे दोघेही झिरोवर आऊट झाले. त्यामुळे सीएसके आरसीबीवर वरचढ ठरली.
ऋतुराज कर्णधारपदाबाबत काय म्हणाला?
“मी नेहमीच कॅप्टन्सीचा आनंद लुटला आहे. कर्णधारपदाचा दबाव असल्याचं मला केव्हाच जाणवलं नाही. कॅप्टन्सी करण्याचा मला अनुभव आहे. तसेच धोनीही सोबत होता.”, असं म्हणत ऋतुराजने नेतृत्वाच्या अनुभव सर्वांसमोर सांगितला. महेंद्रसिंह धोनी याच्या राजनाम्यानंतर ऋतुराज गायकवाड याला चेन्नई सुपर किंग्सची धुरा देण्यात आली. ऋतुराजने सार्थपणे ही जबाबदारी सांभाळत टीमला विजयी केलं. आता चेन्नईचा पुढील सामना हा 26 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध असणार आहे.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिचेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, महेश तीक्षना, मुस्तफिजुर रहमान आणि तुषार देशपांडे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग इलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरुन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंक डागर आणि मोहम्मद सिराज.
टिप्पणी पोस्ट करा