Shiakh mahmmad Baba : सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान-श्री संत शेख मंहमद महाराज

 

ब्युरो टीम : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात विविध जाती, धर्म, पंथ, भाषा, पोशाख अशा अनेक बाबतीत विविधता दिसते. विविधतेत एकता हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्टये आहे. सर्व धर्मिय लोक देशात एकत्र गुण्यागोविंदाने प्रेमाने राहतात. भारतभूमीत महापुरुष, समाजसुधारक, क्रांतीकारक यांनी त्याग, शौर्य, बलिदान यांचा वारसा आम्हांस दिला आहे. संतानी भक्ती मार्गाने देशाचा ध्वज जगात पोहचवला. ज्ञानोबा, तुकोबा, निवृत्तीनाथ याप्रमाणे अहमदनगर मधील श्रीगोंदा येथील संत शेख महंमद महाराजांनी ऐक्याचा समतेचा पुरस्कार करुन समाजाच्या कल्याणासाठी आपले आयुष्य अर्पण केले. संत शेख मंहमद महाराज यांचा यात्रा उत्सव २० मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडतो आहे.त्यानिमित्त हा लेख. संत शेख मंहमद महाराज हे हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक आहेत. त्यांचे वाहिरा मूळगाव असून त्यांची संजीवन समाधी श्रीगोंदा येथे आहे. छ. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे मंहमद महाराज गुरु आहेत. त्यांनी सुफी संत असुनही वारकरी संप्रदायाचा प्रचार केला. सर्व मानव हि एकाच ईश्वराची लेकरे आहेत असा संदेश त्यांनी समाजात दिला. संपुर्ण आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी वहिले. त्यांनी जात, धर्म, पंथ यांना फाटा देत ऐक्याचा, समतेचा व बंधुतेचा प्रचार केला. संत तुकाराम महाराज यांच्या किर्तनावेळी मंडपाला आग लागली असता संत शेख मंहमद महाराजांनी ती आग भक्तीने स्वतःच्या हाताने विझवली होती अशी आख्यायिका आहे. योगसंग्राम ग्रंथ लिहून त्यांनी भक्तीचा प्रचार केला. रोज सर्वधर्मीय भक्त दर्शनासाठी मंदीरात येत असतात. यात्रा काळात सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावेळी भजने, किर्तने व प्रवचन होतात. चंदनलेप वेळी भविकांचा उत्साह शिगेला पोहचतो. मुस्लिम बांधव कव्वाली गीतांचे आयोजन करतात. भक्तीमय वातावरणात यात्रा पार पडते. यात्रेत पाळणे, दुकाने गर्दीने फुलुन जातात.काही ठिकाणी समाजात जाती-धर्मावरून दंगली घडत असताना महमंद महाराजांचे कार्य ऐक्याचे/समतेचे प्रतीक म्हणून जगासमोर उदाहरणं ठेवता येईल. श्रीगोंदा सर्वधर्मीयांचे ऐक्याचे प्रतीक म्हणून महाराष्ट्रात समोर येत आहे. ईश्वर माणसात शोधा, जाती, धर्म,पंथ भेद गाडून टाका व गोरगरिबांची सेवा करा हा संदेश मंहमद महाराजांनी स्वकर्तृत्वाने समाजाला दिला आहे. मंहमद महाराजांच्या समाधी वर नतमस्तक झाल्यास सर्व दुःख, समस्या मिटतात असा भक्तांचा अनुभव आहे.

लेखक - प्रा. महेंद्र मिसाळ ( प्रसिद्ध व्याख्याते व लेखक)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने