ब्युरो टीम : प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि त्यांचा मुलगा कार्तिकेय हे जपानमधील भूकंपातून थोडक्यात वाचले. जपानमध्ये गुरुवारी 5.3 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे झटके जाणवले. त्यानंतर राजामौलींचा मुलगा कार्तिकेयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये त्याने त्याच्या स्मार्टवॉचमध्ये भूकंपाचा अलर्ट दाखवला गेला आणि त्यानंतर काही वेळातच 5.3 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे झटके जाणवू लागले. कार्तिकेयने हेसुद्धा सांगितलं की जेव्हा भूकंप आला होता, तेव्हा RRR या चित्रपटाची संपूर्ण टीम एका इमारतीच्या 28 व्या मजल्यावर होती.
राजामौलींचा मुलगा कार्तिकेयने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘आताच जपानमध्ये भूकंपाचे भयंकर झटके जाणवले. आम्ही 28 व्या मजल्यावर होतो. जमीन हळूहळू हलायला लागली. काही क्षणांतच आम्हाला जाणवलं की हे भूकंपाचे झटके आहेत. मी घाबरलो होतो. पण आमच्या आसपास जे जपानी लोक होते, त्यांना काहीच फरक पडत नव्हता. ते अशा पद्धतीने वागत होते की जणू पाऊसच पडणार आहे.’ गेल्या काही महिन्यांपासून जपानमध्ये सतत भूकंपाचे झटके जाणवत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जपानमध्ये भूकंपाचे 21 झटके जाणवले गेले. त्यापैकी एकाची तीव्रता 7.6 रिश्टर स्केल इतकी होती.
एस. एस. राजामौली हे गेल्या काही दिवसांपासून जपानमध्ये आहेत. ते त्यांच्या चित्रपटाच्या टीमसोबत RRR च्या स्क्रिनिंगसाठी गेले आहेत. जपानमध्ये राजामौलींचा हा सुपरहिट चित्रपट गेल्या 513 दिवसांपासून सलग चालतोय. तिथल्या लोकांमध्ये या चित्रपटाविषयी फार क्रेझ पहायला मिळतेय. म्हणूनच जेव्हा राजामौली तिथे पोहोचले, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. काहींनी शिट्ट्या वाजवल्या तर काहींनी त्यांचं भरभरून कौतुक केलं. राजामौलींच्या एका चाहतीने त्यांना एक हजार ओरिगामी क्रेन्स भेट म्हणून दिल्या होत्या.
टिप्पणी पोस्ट करा