धाराशीव मधील शिंदे गटाचा 300 गाड्यांचा ताफा मुंबईकडे; लोकसभा उमेदवारीची मागणी करणार
ब्युरो टीम : धाराशीवमध्ये उमेदवार जाहीर झाला असला तरी शिंदेंची शिवसेना येथून इच्छूक आहे. या जागेसाठी शिवसेना आग्रही आहे. दुसरीकडे टिकेनंतर राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटलांनी फेसबूकवरच्या एका पोस्टमध्ये बदल केलाय. धाराशीव लोकसभेत महायुतीतला वाद वाढत चालला आहे. जागा शिवसेनेच्या वाट्याला असताना भाजपच्या राणा जगजितसिंहाच्या पत्नी अर्चना पाटलांना राष्ट्रवादीत प्रवेश देत तिकीट दिलं गेलं. त्यावरुन स्थानिक शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे.
तानाजी सावंतांचे पुतणे इच्छूक
उमेदवारीसाठी इच्छूक असलेले मंत्री तानाजी सावंतांचे पुतणे ३०० गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईत पोहोचले आहेत. अर्चना पाटलांच्या उमेदवारीला त्यांचा विरोध आहे. उमेदवारी बदलून जागा आपल्याकडेच ठेवावी असा आग्रह त्यांचे समर्थक करत आहेत.
दोन दिवसांपूर्वी धाराशीवमध्ये शिंदेंच्या समर्थकांनी सामूहिक राजीनामे दिले. प्राथमिक सदस्य नोंदणीच्या अर्जांची होळी करत उमेदवारीचा निषेधही केला. त्यानंतर आता मंत्री सावंतांचे समर्थक मुंबईत दाखल होत उमेदवारीची मागणी करत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यावर काय निर्णय घेतील. याकडे लक्ष लागलं आहे.
उमेदवार बदला म्हणायची हिम्मत पूर्वी कुणाची नव्हती उमेदवार ठरवायला दिल्लीला जावं लागायचं मागच्या वेळी किरीट सोमय्या यांची उमेदवारी शिवसेनेने बदलायला लावली होती, तुमच्यासाठी गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही उमेदवारी देऊ शकत नाही तुम्ही काय शिवसेना वाचवणार तुम्ही स्वतःला वाचवण्यासाठी गेलेला आहेत अशी टीका अंबादास दानवे यांनी केेली आहे.
पाटलांनी फेसबूक पोस्ट चर्चेत
दुसरीकडे मी राष्ट्रवादीचं वर्चस्व का वाढवू. आपण महायुतीचे उमेदवार आहोत. या विधानावर स्पष्टीकरण दिल्यानंतर अर्चना पाटलांनी फेसबूक पोस्ट आता चर्चेत आली आहे. ही पोस्ट वादात आल्यानंतर त्यात दुरुस्तीही केली गेली.
उमेदवारीनंतर अर्चना पाटलांनी घड्याळाच्या चिन्हासह मोदींच्या फोटोची पोस्ट टाकली होती. मात्र त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांचाच फोटो नसल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. टीका सुरु झाल्यानंतर अर्चना पाटलांच्या पोस्टवर घड्याळाचं चिन्ह आणि मोदींच्या फोटोसह अजित पवारांचाही फोटो झळकला. मात्र तोपर्यंत आधीची पोस्ट व्हायरल झाली होती.
धाराशीव लोकसभेत मविआकडून ठाकरेंचे उमेदवार ओमराजे निंबाळकर. तर महायुतीकडून राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटलांमध्ये लढत आहे. मात्र ही जागा शिवसेनेची असल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचे समर्थक अर्चना पाटलांच्या उमेदवारीला विरोध करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा