ब्युरो टीम : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात आहे. आता अहमदनगर लोकसभेची निवडणूक दोन निलेश लंके लढवणार आहेत.
अहमदनगरमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निलेश साहेबराव लंके यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. बारामतीत शरद पवार, रायगड लोकसभेतून अनंत गीते यांच्यानंतर आता निलेश लंके या नावाचा अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे निलेश लंकेंना मतदान करणाऱ्या मतदारांची चांगलीच धांदल उडणार असल्याचे चित्र आहे.
डमी राजकारण करण्याची विखेंची परंपरा - राजेंद्र फाळके
यावरुन महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत भाजपचे उमेदवार सुजय विखेंवर निशाणा साधला आहे. मविआ उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीने अर्ज भरला आहे. महायुतीचे उमेदवार सुजय विखेंनीच डमी उमेदवार दिल्याचा आरोप मविआकडून करण्यात आला आहे. डमी राजकारण करण्याची विखेंची परंपरा आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केली आहे.
शरद पवार - अनंत गीतेंच्या नावाचेही डमी उमेदवार
बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार नावाच्या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच रायगड लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते उभे आहेत. अनंत गीते नावाच्या आणखी दोन उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. यामुळे आता खऱ्या उमेदवारांना फटका बसणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नगरमधून अखेरच्या दिवशी 32 नामनिर्देशनपत्र दाखल
दरम्यान, अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ उडाल्याचे दिसून आले. नगरमधून शेवटच्या दिवशी 27 उमेदवारांनी 32 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या 43 वर पोहचली आहे.
टिप्पणी पोस्ट करा