ब्युरो टीम : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्षाच्या राज्य सुकाणू समितीचे सदस्य नगरमधील नेते घनश्याम शेलार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शेलार यांनी पक्षात प्रवेश केला.
बीआरएस पक्षाचा अलीकडेच तेलंगणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाला. त्यामुळे महाराष्ट्रातही या पक्षाची हवा गेली आहे. आता तिकडे गेलेले नेते पुन्हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षात परतू लागले आहेत, तर काहींनी नवीन पक्षात प्रवेश करायला सुरवात केली आहे. शेलार यांनीही बीआरएस सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.
शेलार यांनी बीआरएसतर्फे लोकसभा निवडणूक लढवावी, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी होती. त्यावर १० एप्रिलला आपण भूमिका स्पष्ट करू, असे शेलार यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात त्यांनी त्याच दिवशी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाविकास आघाडीचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी श्रीगोंदा येथे काँग्रेसतर्फे मेळावा आयोजित केला होता. त्यामध्येच शेलार यांनी पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता श्रीगोंद्यात शेलार यांच्या रुपाने काँग्रेसला पुन्हा नेता मिळाला आहे.
टिप्पणी पोस्ट करा