ब्युरो टीम : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा : द रूल’ हा चित्रपट येत्या 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. सोशल मीडियावरही ‘पुष्पा 2’ची खूप क्रेझ आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. आता प्रदर्शनापूर्वी अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाचा डंका वाजला आहे. हा चित्रपट प्रदर्शित व्हायला असून चार महिने असतानाही त्याने तब्बल 500 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही कमाई डिजिटल आणि डिस्ट्रीब्युशन राइट्स विकून करण्यात आली आहे. ‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’चे डिजिटल राइट्स विकले गेले आहेत. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने हे राइट्स विकत घेतले आहेत.
या रिपोर्ट्सनुसार, तब्बल 250 ते 300 कोटी रुपयांची डील झाली आहे. सर्व भाषांमधील चित्रपटांसाठी ही विक्रमी डील असल्याचंही म्हटलं जात आहे. इतकंच नव्हे तर या करारात ऐनवेळी काही बदलसुद्धा होऊ शकतात. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट किती कमाई करतो, त्यावरून करारात काही बदल होऊ शकतात. तर हिंदी भाषेतील डिस्ट्रिब्युशनचे राइट्स तब्बल 200 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. या हिशोबाने ‘पुष्पा 2’ने प्रदर्शनापूर्वीच तब्बल 500 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने रामचरणच्या ‘RRR’लाही मागे टाकलं आहे. राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाचे डिजिटल राइट्स तब्बल 170 कोटी रुपयांना विकले गेले होते.
2021 मध्ये ‘पुष्पा : द राइज’ हा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला सर्व भाषांमध्ये दमदार यश मिळालं होतं. इतकंच नव्हे तर अल्लू अर्जुनला या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार मिळवणारा अल्लू अर्जुन पहिला तेलुगू अभिनेता ठरला. पहिल्या भागानंतर प्रेक्षकांमध्ये ‘पुष्पा 2’विषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. हा सीक्वेल पहिल्यापेक्षा अधिक बजेटचा आणि भव्यदिव्य असणार आहे. ‘पुष्पा 2’चा टीझर पाहिल्यानंतर पहिल्या भागापेक्षा हा दुसरा भाग अधिक पॉवरफुल असल्याचं दिसून येत आहे.
सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश प्रताप भंडारी आणि सुनील यांच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे अल्लू अर्जुनने ‘पुष्पा 2’साठी काहीच फी घेतली नाही. मात्र तरीसुद्धा अल्लू अर्जुन कोट्यवधी रुपयांत कमाई करणार आहे. कारण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या एकूण कमाईपैकी 33 टक्के भाग त्याला मिळणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा