Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभेतून छगन भुजबळ यांची माघार; पत्रकार परिषदेत केले अनेक गौप्यस्फोट

ब्युरो टीम : महायुतीच्या नाशिकच्या जागेबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सस्पेन्स बघायला मिळतोय. नाशिकचे शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा या जागेवर पक्का दावा आहे. यासाठी हेमंत गोडसे सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईत येत आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही या जागेवर दावा केला जात होता. या जागेवरुन महायुतीत मोठा तिढा निर्माण झाला होता. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून उघडपणे नाशिकच्या जागेवर दावा सांगितला जात होता. पण आज वेगळ्या घडामोडी घडल्या आहेत. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

छगन भुजबळ यांनी आपल्या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट केले. नाशिकच्या जागेसाठी दिल्ली पातळीवर हालचाली घडल्या. आपल्याला महायुतीच्या दिग्गजांकडून नाशिकच्या जागेसाठी आग्रह करण्यात आला, असा मोठा खुलासा छगन भुजबळ यांनी केला. तरीही याबाबत बऱ्याच चर्चा झाल्यानंतरही उमेदवार अधिकृतपणे जाहीर झाला नसल्याने छगन भुजबळ यांनी आपण माघार घेत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे नाशिकच्या जागेबाबतचा सस्पेन्स वाढला आहे. कारण छगन भुजबळ यांनी माघार घेतली असली तरी महायुतीचे वरिष्ठ नेते आता काय निर्णय घेतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

“नाशिकच्या बाबतीत होळीच्या दिवशी आम्हाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निरोप आला म्हणून आम्ही देवगिरी बंगल्यावर गेलो. तिथे अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे बसले होते. त्यावेळी ते म्हणाले की, आताच आम्ही सहा वाजता दिल्लीवरुन आलो. दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महायुतीच्या इतर प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. अजित दादा नाशिकच्या जागेबाबत म्हणाले की, आमचे आमदार आहेत. त्यामुळे आम्हाला ती जागा द्यावी. त्यांनी विचारलं की कोण आहे तुमचा उमेदवार? त्यांनी सांगितलं की, माजी खासदार समीर भुजबळ उमेदवार असतील. पण त्यांनी सांगितलं नाही, तिथे छगन भुजबळ हेच उभे राहतील”, असं छगन भुजबळ म्हणाले.

“मी उभा राहणार? मी तर सीट मागितली नाही. पण ते त्यांनी सांगितलं. शिंदे म्हणाले की, ती आमची जागा आहे. तर अमित शाह म्हणाले, आम्ही शिंदेंना समजवू. छगन भुजबळ तिथे लढतील. मी म्हटलं थोडा वेळ द्या, उद्या सांगतो. पण दुसऱ्या दिवशी गेलो तर ते म्हणाले की, नाही तुम्हाला लढावंच लागेल. त्यानंतर मी नाशिकला गेल्यावर चाचपणी सुरु केली. समोरुन खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर बातमी बाहेर फुटली आणि चर्चा सुरु झाली”, असा खुलासा छगन भुजबळ यांनी केला.

छगन भुजबळ यांची माघार

“मी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शाहनिशा करण्यासाठी विचारलं. तर ते म्हणाले की, केंद्रातून तुम्हालाच उभं राहायला सांगितलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी होतो तिथे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी तसं सांगितलं आहे. पण त्यानंतर चर्चा सुरु झाल्या आणि अधिकृत उमेदवार जाहीर झालाच नाही”, अशी खंत छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. विरोधी पक्षाचा उमेदवार जाहीर होऊन तीन आठवडे झाले. विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा जोरदार प्रचारही सुरु आहे. त्यामुळे महायुतीने कोणताही उमेदवार जाहीर करावा. आपण उमेदवारीतून माघार घेतोय, असं छगन भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केलं.

 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने