ब्युरो टीम : काँग्रेस पक्षाच्या 'पंजा' या चिन्हावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण मनसेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी काँग्रेस पक्षाचे पंजा हे चिन्ह बदला किंवा पोलीस दलाच्या बोधचिन्हांमध्ये असलेला पंजा काढून टाका अशी मागणी करत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीवर तात्काळ निर्णय न झाल्यास या चिन्हांच्या संदर्भात न्यायालयात जाणार असल्याचे देखील अशोक तारे यांनी सांगितलं.
पोलिसांच्या बोधचिन्हावर आक्षेप
काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह हे पंजा असून पोलीस दलाच्या बोधचिन्हामध्ये देखील पंजा चिन्हाचा वापर करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेशावर देखील पंजा चिन्ह असतं. निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक पोलीस कर्मचारी काम करत असतात, त्यामुळे त्यांच्या गणवेशावर असलेल्या पंजामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार मनसेने केली आहे. त्यामुळे काँग्रेसचे चिन्ह बदलावं किंवा पोलीस दलाच्या बोधचिन्हातील पंजा काढून टाकावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
आधीच राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चिन्हांचा वाद न्यायालयात पोहोचला असताना आता काँग्रेसच्या चिन्हावरही तक्रार करण्यात आली आहे. यावर आता निवडणूक आयोग यावर काय कारवाई करतोय हे पाहावं लागेल.
काँग्रेसच्या चिन्हाचा इतिहास
काँग्रेसने 1951-52 सालची पहिली निवडणूक ही बैलजोडी या चिन्हावर लढली होती. ग्रामीण भागातील लोक आणि शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन हे चिन्ह निवडण्यात आलं होतं. पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली लढलेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठं बहुमत प्राप्त झालं.
पंडित नेहरू आणि नंतर लाल बहादूर शास्त्रींच्या निधनानंतर इंदिरा गांधी या पंतप्रधान बनल्या. 1967 सालच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी सुरू झाली. त्यानंतर काँग्रेसमध्ये फूट पडली आणि कामराज, मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली मूळ काँग्रेस आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली एक काँग्रेस असे दोन गट बनले. त्यावेळी मूळ चिन्ह असलेली बैलजोडी हे मोरारजी देसाईंच्या काँग्रेसला देण्यात आलं आणि इंदिरा गांधींना गाय-बछडा हे चिन्ह मिळालं.
नंतरच्या काळात 1977 मध्ये काँग्रेसमध्ये आणखी एक फूट पडली. त्यावेळी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस (आय) ची स्थापना करण्यात आली आणि त्याला हात हे चिन्ह मिळालं. 1977 च्या निवडणूक जबरदस्त हार झालेल्या काँग्रेसचा 1980 साली मात्र पुन्हा विजय झाला. त्यामुळे हात हे चिन्ह कायम ठेवण्याचा निर्णय इंदिरा गांधी यांनी घेतला. तेव्हापासून काँग्रेसचे हात हेच चिन्ह कायम राहिलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा