ब्युरो टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपाचा जाहीरनामा काल प्रसिद्ध झाला. भाजपाकडून याला संकल्प पत्र म्हटलं जात. त्या विषयी आज भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली व त्यातले बारकावे समजून सांगितले. “भाजपाचा जाहीरनामा ही मोदींची गॅरेंटी आहे. भाजपाचा जाहीरनामा सर्व घटकांना समर्पित आहे” असं फडणवीस म्हणाले. सरकारी नोकऱ्या किती देणार? हा मुद्दा जाहीरनाम्यात आलेला नाही. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ‘जेवढ्या जागा रिकाम्या आहेत, त्या सगळ्या भरण्याचा निर्धार आहे’ असं उत्तर दिलं. “काँग्रेसचा जाहीरनामा हा अपयशी आहे. काँग्रेसने छत्तीसगड, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्ये विजय मिळवला होता. पण जाहीरनाम्यातील एकही गोष्ट पूर्ण केली नाही. आता कर्नाटकात निवडून आले, तरी जाहीरनाम्यातील एकही गोष्ट पूर्ण केलेली नाही.
काँग्रेससासठी जाहीरनामा एक कागद आहे. आमच्यासाठी मोदींची गॅरेंटी आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “मल्लिकार्जुन खरगे यांनी देशाच सोडून द्यावं, ते कर्नाटकातून येतात. काँग्रेस अध्यक्ष आहेत. कर्नाटकात तुम्ही दिलेली आश्वासन पूर्ण करु शकला नाहीत. आश्वासन पूर्ण करण्यासाठी नसतात, असं तुमची लोक म्हणतात” अशा शब्दात फडणवीसांनी खरगेंवर निशाणा साधला. संविधान बदलण्याच्या मुद्दावर देखील फडणवीस यांनी भाष्य केलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच संविधान होतं, म्हणून चहा विकणाऱ्याचा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला. एनडीएचा प्रमुख म्हणून मोदींची निवड झाली, त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम संविधानाची पूजा केली. त्यानंतर पद स्वीकारलं. कुठल्याही ग्रंथापेक्षा संविधान महत्त्वाच असल्याच त्यांनी म्हटलं. मागची दहावर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यांनी संविधानाच रक्षण केलं. संविधान बदलण्याचा विचार केला नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संविधानाबद्दल सुप्रीम कोर्टाने काय म्हटलय?
“सगळ्यात महत्त्वाच म्हणजे, सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलय की, संविधानाच बेसिक स्ट्रक्चर बदलण्याचा अधिकार संसदेला नाही. हा काँग्रेसचा जुमला आहे. ज्यावेळी विकासाचा विचार मांडता येत नाही. ज्यावेळी कुठलही जनहिताच कार्य करता येत नाही. विश्वासहर्ता संपलेली असते. अशावेळी लोकांच्या मनात कनफ्युजन निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. 2014, 2019 आणि आता 2024 मध्येही काँग्रेसचा तोच प्रयत्न आहे. पण लोकांचा विश्वास मोदींवर आहे. तीन राज्यात मोदींच्या बाजून कौल दिला. आता सुद्धा जनता मोदींच्या बाजूने मतदान करेल” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा