ब्युरो टीम : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून यंदा या निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान होणार आहे. यंदाही निवडणुकीची घोषणा होताच ‘ईव्हीएम’वर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत मतदानासाठी मतपत्रिका वापरण्याची मागणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगानं ईव्हीएम व व्हीव्हीपेटचा वापरच मतदानासाठी केलं जाईल, असं स्पष्ट केलंय. पण यानिमित्तानं ईव्हीएम पुन्हा एकदा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आलं आहे. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, ईव्हीएमचा सर्वात प्रथम वापर कोणत्या निवडणुकीत झाला? चला तर, आज याबाबत जाणून घेऊ.
येथे बनवले जाते ईव्हीएम
भारतात ईव्हीएम बनवण्याचं काम दोन सरकारी कंपन्यांकडे आहे. या कंपन्या बेंगळुरू येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि हैदराबाद येथील इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या आहेत. ईव्हीएममध्ये दोन युनिट्स असतात. एक कंट्रोल युनिट आणि दुसरे बॅलेट युनिट. कंट्रोल युनिटवर निवडणूक अधिकारी बटण दाबताच बॅलेट युनिट सक्रिय होते, व मतदाराला मतदान करण्यासाठी उमेदवाराच्या नावासमोरील बटण दाबावे लागते. बटण दाबल्यानंतर बीप असा आवाज आल्यावर मतदान प्रक्रिया पूर्ण होते. मतदान संपल्यानंतर ज्या ठिकाणी ईव्हीएम आणि व्हीव्हीपेट ठेवले जातात, त्याला स्ट्राँग रूम म्हणतात. येथे अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. सीसीटीव्हीद्वारे तेथे 24 तास लक्ष ठेवलं जातं. तसेच स्ट्राँग रूम परिसरात सीएपीएफचे जवान 24 तास तैनात असतात.
ईव्हीएमचा इतिहास
भारतात पहिल्यांदाच निवडणूक आयोगानं 1977 मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या सरकारी कंपनीला ईव्हीएम बनवण्याचं काम दिलं. कंपनीनं 1979 मध्ये ईव्हीएमचा प्रोटोटाइप सादर केला. तो 6 ऑगस्ट 1980 ला निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांना दाखवला होता. यानंतर मे 1982 मध्ये पहिल्यांदा केरळमध्ये ईव्हीएम वापरून विधानसभा निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी ईव्हीएम वापरून निवडणुका घेण्याचा कायदा नव्हता. त्यामुळे ईव्हीएमद्वारे घेण्यात आलेल्या मतदानाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. त्यानंतर ही निवडणूक रद्द करण्यात आली.
कायद्यामध्ये केली सुधारणा
1989 मध्ये लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये सुधारणा करून ईव्हीएमद्वारे निवडणुका घेण्याची तरतूद करण्यात आली. मात्र, कायदा होऊनही अनेक वर्षे ईव्हीएमचा वापर करण्यात आला नव्हता. 1998 मध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीच्या 25 विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम वापरून निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर 1999 मध्ये लोकसभेच्या 45 मतदारसंघात ईव्हीएमद्वारे मतदान झालं होतं. फेब्रुवारी 2000 मध्ये हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीतही 45 मतदारसंघात ईव्हीएमचा वापर करण्यात आला होता. मे 2001 मध्ये प्रथमच तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालच्या सर्व विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम वापरून मतदान झाले. त्यानंतर 2004 च्या लोकसभा निवडणुकीत सर्व 543 मतदारसंघात ईव्हीएमद्वारे मतदान झालं होतं. तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीत सर्व जागांवर ईव्हीएमद्वारे मतदान झालं होतं.
टिप्पणी पोस्ट करा