ब्युरो टीम : राजकारणात कधी काय होईल, काहीच सांगता येत नाही. कुणाच्या आयुष्यात कधी कोणता प्रसंग येईल आणि कोण कोणत्या मार्गाला लागेल याचा भरोसा नाही. तसेच कुणाच्या पदरात काय यश मिळून जाईल, याचाही भरोसा नाही. विशेष म्हणजे जळगावच्या राजकारणात आता वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे. भाजप जळगावमध्ये उमेदवार बदलणार असल्याची चर्चा सुरु आहे. अर्थात ही चर्चा मुद्दाम घडवली जातेय की, खरंच पडद्यामागे तसं घडतंय? याचं उत्तर पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच. पण या चर्चांना आधार असणारी एक घडामोड जळगावात आज घडली आहे. जळगाव लोकसभेत ठाकरे गटाने उमेदवार दिल्यानंतर भाजपकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. विशेष म्हणजे तब्बल एक ते दीड वर्षांपासून पक्षाच्या स्थानिक बैठकांपासून लांब असलेले माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांनी आज तातडीने मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. जळगावातील भाजप कार्यालयात मंत्री गिरीश महाजन आणि ए. टी. नाना पाटील यांच्यात एक ते दीड तास बंद दाराआड चर्चा झाली.
ए. टी. नाना पाटील जळगाव मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत ठाण मांडून होते. स्मिता वाघ यांना उमेदवारी मिळाल्यामुळे ए. टी. नाना नाराज असल्याची चर्चा आहे. दोन महिन्यांनंतर तसेच उमेदवार जाहीर झाल्यानंतर ए. टी. नाना आज पहिल्यांदाच भाजप कार्यालयात आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये ए. टी. नाना यांना उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली.
ए. टी. नाना यांनी सस्पेन्स वाढवला
“दोन वेळा खासदार होतो. त्यामुळे मला उमेदवारी मिळायला पाहिजे होती. मी सुद्धा मागणी केली होती, अशी ए. टी. नाना पाटील यांची भूमिका आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी चर्चा करण्यासाठी बोलावले होते, म्हणून चर्चा करण्यासाठी आलो होतो. नेमकी काय चर्चा झाली हे सांगता येणार नाही. तुम्ही नेत्यांना विचारा”, अशी प्रतिक्रिया ए. टी. नाना पाटील यांनी दिली.
“सर्व्हेत तर मी आजही एक नंबरवर आहे. तुमच्या शुभेच्छा असल्या तर चांगलं काही तरी घडेल”, असं म्हणत ए. टी. नाना पाटील पाटील यांनी उमेदवारीबाबत सस्पेन्स वाढवला. उमेदवार बदलेल का? असं विचारताच ए. टी. नाना पाटील यांनी स्मितहास्य दिलं. त्यानंतर ते काहीच म्हणाले नाहीत.
गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण
या चर्चेनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “माजी खासदार ए. टी.नाना पाटील यांच्यासह पारोळ्यातील अनेकांनी आज माझी भेट घेतली. अनेक जण भेटत आहेत. बैठका होत आहेत. कारण मला पाच लाखांचा मताधिक्यांचा आकडा पार करायचा आहे. त्यामुळे आम्ही सर्वच तालुक्यांमध्ये प्रयत्न करत आहोत. पण मी कधी एक खोटं बोलत नाही आणि माझा आकडा कधी चुकू शकत नाही. लोकांची मानसिकता आहे की पुन्हा यावेळी मोदींना पंतप्रधान करायचं आहे. सर्वांची मानसिकता आता फक्त कमळाचे बटन दाबायचं, अशी झाली आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले. उमेदवार बदलणार असल्याचा चर्चेवर मंत्री गिरीश म्हणाले, “तुमच्याकडे अशा चर्चा असतात. आमच्याकडे कुठलीही चर्चा नाही.”
टिप्पणी पोस्ट करा