Jui Gadkari : इन्स्टाग्रामवर एका युजरने जुईला थेट धमकी; अभिनेत्री जुई गडकरीने दिले सडेतोड उत्तर

 

ब्युरो टीम : ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. इन्स्टाग्रामवर एका युजरने जुईला थेट धमकी दिली आहे. आम्हाला फॉलो कर, नाहीतर तुला पोलिसांत टाकू, असं युजरने लिहिलं आहे. त्याचा स्क्रीनशॉट शेअर करत जुईनेही संबंधित युजरला सडेतोड उत्तर दिलं आहे. येच तू कर्जतला, बघतेच मी पण.. असा इशारा जुईने दिला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

इन्स्टाग्रामवर जुई गडकरीला धमकी

‘काय गं, तुला खूप माज आलाय का? आम्ही फॉलो करायचं आणि तुला आम्हाला फॉलो करायला काय झालं? कळत नाही का तुला? आताच्या आता आम्हाला फॉलो करायचं. सपना पांचाळ, राखी सुतार, करुणा विन्हेरकर, यश विन्हेरकर यांना तू फॉलो कर. नाहीतर तुला जेलमध्ये टाकेन. आजपर्यंत तू आमची आवडती होतीस, कारण आम्हाला वाटलं की तू आम्हाला फॉलो करशील. पण नाही. म्हणून मी तुला पोलिसांत टाकेन. मी उद्याच्या उद्या तुझ्या गावाला येते कर्जतला समजलं. कुठेही पळायचं नाही’, अशा शब्दांत जुईला धमकी देण्यात आली.

मेसेजचा हा स्क्रीनशॉट शेअर करत जुईनेही ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘हे सहन केलं जाणार नाही, आधीच सांगते. थेट पोलीस स्टेशनला भेटू मग आपण’, असं तिने लिहिलंय. त्याचसोबत ‘राखी सुतार.. झालीस तू फेमस. येच कर्जतला, बघतेच मी पण’, असा इशारा जुईने दिला आहे.

कलाविश्वात काम करणाऱ्या अनेक सेलिब्रिटींना अशा ट्रोलिंगचा सतत सामना करावा लागतो. अनेकदा या ट्रोलिंगमागचं कारणही अत्यंत क्षुल्लक असतं. काही दिवसांपूर्वी अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि त्याच्या पत्नीला ‘जहांगीर’ या त्यांच्या मुलाच्या नावावरून प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. यानंतर चिन्मयने भविष्यात कधीच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकाणार नसल्याचा मोठा निर्णय जाहीर केला होता. आता जुई गडकरीने ट्रोलरला थेट उत्तर दिलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने