Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायचाय? मग हे वाचाच



ब्युरो टीम : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आता जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहेत. देशातील काही मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तुम्हालाही उमेदवारी अर्ज भरायचा असेल, तर असा अर्ज दाखल करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते. चला तर, त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ.

नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी दिनांक, वेळ, ठिकाण व इतर आवश्यक बाबी:

-    नामनिर्देशनपत्र निवडणूक अधिसूचनेत नमूद केलेल्या कालावधीत स्वीकारले जाणार आहेत. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार नाहीत.

-    नामनिर्देशनपत्र हे नमुना २अ मध्ये दाखल करावे, त्यासोबत नमुना २६ मधील प्रतिज्ञापत्र सादर करावे. नामनिर्देशनपत्राचा नमुना २अ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.

-    नमुना २६ मधील प्रतिज्ञापत्र पूर्णपणे भरलेले असणे आवश्यक आहे.

-    एका उमेदवारास अधिकाधिक ४ नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १७३ (अ) अन्वये उमेदवाराने स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी किंवा प्राधिकृत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष छाननीपूर्वी शपथ घ्यावी लागेल.

-    दोनपेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाही.

-    नामनिर्देशनपत्र दाखल करणारे उमेदवाराचे वय २५ वर्षापेक्षा कमी नसावे.

-    उमेदवार निवडणूक लढवीत असणाऱ्या लोकसभा मतदारसंघाव्यतिरीक्त, इतर लोकसभा मतदारसंघातील मतदार असल्यास, ज्या लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये उमेदवाराचे नाव आहे, त्या मतदारयादीची प्रमाणित प्रत नामनिर्देशनपत्रासोबत दाखल करणे बंधनकारक राहील.

-    उमेदवार स्वतः किंवा त्यांचे कमीत कमी एका प्रस्तावकाने स्वतः उपस्थित राहून नामनिर्देशनपत्र दाखल करावे.

-    नामनिर्देशनपत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात उमेदावारासहीत एकूण ५ व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल. (त्यामध्ये उमेदवार व त्यांचे चार प्रतिनिधी यांनाच प्रवेश देण्यात येईल.)

-    नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवाराच्या केवळ ३ वाहनांना कार्यालयाच्या परिसरात प्रवेश देण्यात येणार आहे. वाहने वाहनतळावरच उभी करण्याची अनुमती राहील.

नामनिर्देशनपत्र दाखल करताना आवश्यक असलेले प्रस्तावक

-    उमेदवार हा ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे त्याच लोकसभा मतदारसंघातील मतदार हे प्रस्तावक असणे बंधनकारक राहील.

-    मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवारास १ मतदार प्रस्तावक म्हणून असणे बंधनकारक राहील.

-    अपक्ष उमेदवार आणि इतर राज्यातील मान्यताप्राप्त पक्ष, नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार यांना मतदारसंघातील १० मतदार प्रस्तावक म्हणून असणे बंधनकारक राहील.

-     प्रस्तावक अशिक्षीत असल्यास, त्यांनी त्यांचा अंगठा (ठसा) हा निवडणूक निर्णय अधिकारी किंवा विनिर्दिष्ट सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या उपविभागीय अधिकारी दर्जापेक्षा कमी नसलेल्या अधिकाऱ्यासमोर जाऊन त्यांच्याकडून प्रमाणित करुन घेणे बंधनकारक राहील.

शपथपत्र

-    प्रपत्र-२६ मधील शपथपत्र न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग किंवा नोटरी पब्लिक किंवा उच्च न्यायालयाने शपथपत्र करण्यासाठी प्राधिकृत केलेल्या शपथ आयुक्त यांचेसमोर केलेले असणे बंधनकारक राहील.

-    शपथपत्राच्या प्रत्येक पृष्ठावर उमेदवाराची स्वाक्षरी आवश्यक आहे. या व्यतिरिक्त शपथपत्राच्या प्रत्येक पृष्ठावर नोटरी किंवा शपथ आयुक्त किंवा दंडाधिकारी ज्यांच्या समक्ष शपथपत्र सत्यापित केले गेले असल्यास त्यांचा शिक्का असणे आवश्यक राहील.

-     नामनिर्देशनपत्रासोबत विहित नमुन्यातील शपथपत्र हे १०० रुपयांच्या मुद्रांक कागदावर देणे बंधनकारक राहील.

-    शपथपत्रातील सर्व माहिती किंवा रकाने पूर्णपणे भरलेले असावे. शपथपत्रातील माहिती टिक, डॅश केलेली ग्राह्य धरली जाणार नसून त्यामध्ये निरंक (निल) किंवा लागू नाही (नॉट ॲप्लिकेबल) अशी स्पष्ट माहिती नमूद करणे बंधनकारक राहील.

ना देय प्रमाणपत्र

-    उमेदवारांनी मागील १० वर्षाच्या कालावधीत शासनाने वाटप केलेल्या निवासस्थानाचा ताबा घेतला असल्यास, शासकीय निवासस्थानाचे भाडे, विद्युत, पाणीपट्टी, दूरध्वनी आकारणी केल्याबाबत संबंधित यंत्रणेचे 'ना देय प्रमाणपत्र' सादर करणे बंधनकारक राहील.

 

राजकीय पक्षाच्या उमेदवाराने दाखल करावयाचे फॉर्म

-    राजकीय पक्षाच्या उमेदवाराने प्रपत्र ‘ए’ आणि ‘बी’ यांची मूळ शाईची स्वाक्षरीत प्रत पक्षाचे मोहोरेसह नामनिर्देशनपत्र दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल करणे बंधनकारक राहील.

अनामत रक्कम

-    सर्वसाधारण उमेदवारांसाठी अनामत रक्कम २५ हजार रुपये व उमेदवार अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील असल्यास १२ हजार ५०० रुपये भरल्याची पावती किंवा चलनाची प्रत नामनिर्देशनपत्रासोबत जोडणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रासोबत जात, जमात प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत सादर करावी.

-    अनामत रक्कम रोख स्वरुपात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात स्वीकारली जाईल.

बँक खाते

-    उमेदवारांनी निवडणूकीसाठी नव्याने स्वतंत्र बँक खाते उघडणे बंधनकारक राहील. इतर कोणतेही बँक खाते ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीव्यतिरिक्त इतर कोणतेही व्यवहार असू नयेत.

-    सदरील बँक खाते नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या कमीत कमी एक दिवस अगोदर उघडलेले असावे.

-    नामनिर्देशनपत्रासोबत बँकेच्या पासबुकची किंवा बँक खात्याच्या व्यवहाराचा तपशील छायांकित प्रत सादर करावी.

 

उमेदवाराचे स्वतःचे छायात्रिच

-    उमेदवाराचे छायाचित्र पांढऱ्या किंवा फिकट पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवरील पूर्ण चेहरेपट्टी असलेले स्टॅम्प साईज २ से.मी. X २.५ से.मी. आकाराचे अलीकडच्या काळातील असावे. (मागील लगतच्या तीन महिन्यातील छायाचित्र असावे).

-    निवडणूक आयोगाने दिलेल्या निकषाप्रमाणे नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातील नमूद जागी छायाचित्र चिटकवावे.

-    उमेदवारांनी ५ छायाचित्र स्वतंत्र दाखल करावेत. छायाचित्रावर, पाठीमागे नाव नमूद करुन स्वाक्षरी करणे बंधनकारक राहील.

-    छायाचित्र दाखल करताना भारत निवडणूक आयोगाचे विहित नमुन्यातील घोषणापत्र दाखल करावे.

इतर महत्त्वाच्या बाबी

-    नामनिर्देशनपत्र दाखल करता वेळी येणारी वाहने, व्यक्ती, मिरवणूक व इतर बाबी यावर होणारा खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात बंधनकारक राहील.

-    निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयीन परिसरात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची उमेदवारांनी किंवा त्यांचे प्रतिनिधींनी दक्षता घ्यावी.

दरम्यान, वरील सूचना सर्वसाधारण स्वरुपाच्या असून नामनिर्देशनपत्र दाखल करताना भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना व तरतूदीनुसार परिपूर्ण नामनिर्देशनपत्र भरण्याची व त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे दाखल करण्याची अंतिम जबाबदारी ही उमेदवाराची राहील.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने