Narendra Modi : उद्या भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार; विकसित भारत 2047” अशी या जाहीरनाम्याची थीम

 

ब्युरो टीम : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून “संकल्प पत्र” नावाचा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ९ वाजता दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करतील. यावेळी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित राहणार आहेत.

जाहीरनाम्यात काय असेल विशेष

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या जाहीरनाम्यात विकास, समृद्ध भारत, महिला, तरुण, गरीब आणि शेतकरी यांच्यावर भर असेल. पक्ष केवळ तीच आश्वासने देणार आहे जी येत्या काही वर्षात पूर्ण करण्याचा भाजपचा संकल्प असेल. “मोदीची हमी: विकसित भारत 2047” असं या जाहीरनाम्याची थीम असू शकते.

15 लाखांहून अधिक सूचना प्राप्त

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील भाजपचा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. भाजपला त्यांच्या जाहीरनाम्यासाठी 15 लाखांहून अधिक सूचना मिळाल्या आहेत, ज्यात नमो ॲपद्वारे चार लाखांहून अधिक आणि व्हिडिओद्वारे 10 लाखांहून अधिक सूचनांचा समावेश आहे.

भारतीय जनता पक्षाने यासाठी निवडणूक जाहीरनामा समिती स्थापन केली होती. ज्यामध्ये २७ सदस्यांचा समावेश होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे निमंत्रक आणि सहसंयोजक होते. जाहीरनामा पॅनेलच्या सदस्यांमध्ये अर्जुन मुंडा, भूपेंद्र यादव, अर्जुन राम मेघवाल, किरेन रिजिजू, शिवराज सिंह चौहान, वसुंधरा राजे, स्मृती इराणी, सुशील मोदी, केशव प्रसाद मौर्य, अश्विनी वैष्णव, धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र पटेल यांचा समावेश होता.

काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

काँग्रेसने भाजपच्या आधी “न्याय पत्र” नावाचा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. राहुल गांधींनी जनतेसाठी 25 हमी दिल्या आहेत. कुटुंबातील सर्वात गरीब महिलांना वार्षिक 100,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचे मुख्य वचन दिले आहे. देशात सात टप्प्यात मतदान होणार असून ४ जून रोजी निकाल लागणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने