Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर; कोण काय बोलणार याची उत्सुकता

 

ब्युरो टीम : राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर दिसतील. लवकरच राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरती होईल अशी माहिती अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना दिली. लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात जाहीर पाठिंबा दिला होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून आणण्याचे आवाहन केले आहे. तसेच लवकरच प्रचार सभा घेण्याचे पण त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर आता ही महत्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे.

अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर

अमित ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. ते प्रभाग निहाय बैठका घेत आहेत. महायुतीला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. महायुतीचे काम करण्यासंदर्भात आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेनेच्यावतीने महायुतीला पाठिंबा दिलेला आहे जे मनसे पदाधिकारी पक्षाचे काम करणार नाहीत त्यांच्यावरती कारवाई केली जाईल अशा पद्धतीचा आदेश सुद्धा आता मनसेकडून देण्यात आलेला आहे. त्यामुळे महायुतीसाठी काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मनसे दणका देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वसंत मोरे सोशल मीडियाच्या आहारी

पुणे दौऱ्यादरम्यान अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांच्यावर पण निशाणा साधला. वसंत मोरे हे सोशल मीडियाच्या आहारी गेल्याचा चिमटा त्यांनी काढला. मनसेने लोकसभा निवडणूक न लढविण्याची भूमिका घेतल्यानंतर मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे उमेदवारीसाठी चाचपणी केली होती. त्यानंतर त्यांनी वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची पण भेट घेतली होती.पुणे लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे बहुजन वंचित आघाडीकडून लढत आहेत. त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, माजी महापौर आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा सामना करावा लागणार आहे. पुणे लोकसभेची लढत तिरंगी होणार आहे. तर चार दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांना भेटणार असल्याचे सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली होती.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने